सलमान रश्दी यांनी ‘सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तक लिहिल्यामुळेच त्यांच्यावर आक्रमण ! – लेखिका तस्लिमा नसरीन

डावीकडून लेखिका तस्लिमा नसरीन आणि लेखक सलमान रश्दी

नवी देहली – प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील २४ वर्षीय इराणी-अमेरिकन हादी मातर याने आक्रमण केले. वर्ष १९८९ मध्ये रश्दी यांच्या विरोधात फतवा काढणारे अयातुल्ला खोमेनी आणि त्यांचे उत्तराधिकारी अयातुल्ला खामेनी यांची छायाचित्रे हादी मातर याच्या फेसबूक खात्यावर आहेत. त्यामुळे या आक्रमणामागील हेतूचा आता तुम्हीच अंदाज लावू शकता, असे टवीट मूळच्या बांगलादेशी आणि आता भारतात वास्तव्य करणार्‍या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले.

अन्य एका ट्वीटमध्ये नसरीन म्हणाल्या, ‘‘मला असे वाटते की, रश्दी यांनी ‘सॅटनिक व्हर्सेस’ हे पुस्तक लिहिल्यासाठी ज्या माणसाला त्यांना मारायचे होते, त्याने ते पुस्तक वाचलेले नाही. मला वाटते की, पुस्तके लिहिल्यासाठी मला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या इस्लामवाद्यांनीही माझे एकही पुस्तक वाचलेले नाही.’’

धर्मचिकित्सेतून इस्लामला सूट नको ! – नसरीन

तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या की, इतर सर्व धर्मांना लागू होणार्‍या धर्मचिकित्सेतून इस्लामला सूट दिली जाऊ नये. इस्लाम धर्माच्या अमानवीय, भेदभाव करणार्‍या, तसेच अवैज्ञानिक आणि तर्कहीन पैलूंवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून इस्लामला प्रबोधन प्रक्रियेतून पुढे न्यायला हवे.