स्वतःच्या हेरगिरी जहाजाचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला गेल्याने चीनचा तीळपापड !

जहाजाच्या दौर्‍याला भारताचा विरोध कायम

कोलंबो – भारताच्या तीव्र विरोधानंतर चीनच्या हेरगिरी करणार्‍या जहाजाचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला गेल्याने चीनचा तीळपापड झाला आहे.

‘चीनचे हेरगिरी करणारे जहाज श्रीलंकेत आल्यास भारताची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल’, असे सांगत भारताने या जहाचाच्या श्रीलंका दौर्‍याला विरोध केला होता. भारताच्या या विरोधानंतर श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिनी दूतावासाला ‘या प्रकरणात दोन्ही देशांत पुढील सविस्तर चर्चा होत नाही, तोपर्यंत ‘युआन वांग ५’ ही गुप्तहेर नौका श्रीलंकेत पाठवू नये’, अशी सूचना केली आहे. यामुळे चीनच्या श्रीलंकेतील राजदूतांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेऊन जहाजाचा दौरा पुढे ढकलण्यापूर्वी प्रथम चीनमधील शी जिनपिंग सरकारशी चर्चा करण्याची सूचना केली.  त्यामुळे चीनच्या हेरगिरी जहाजाचा दौरा श्रीलंका सरकारसाठी डोकेदुखी बनला आहे.