४ मिशनर्यांना अटक
ठाणे, ६ ऑगस्ट (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून होत आहेत. या भागांतील गरीब आणि आशिक्षित आदिवासींच्या अज्ञानाचा अपलाभ घेत, तसेच त्यांना विविध आमीषे दाखवत त्यांचे धर्मांतर केले जात आहे. डहाणू येथे धर्मांतराचा असाच एक प्रयत्न एका हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्यांच्या साहाय्याने हाणून पाडला. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४ मिशनर्यांना अटक केली.
१. डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे ५ ऑगस्टला दुपारी ४ ख्रिस्ती मिशनर्यांनी सदर हिंदु महिलेच्या घरात शिरून ‘ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बरे होईल. तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू नका’, असे सांगितले आणि पैशांचे आमीष दाखवत तिला ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची सक्ती केली. यावर सदर महिलेने गावकर्यांच्या साहाय्याने डहाणू पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
२. यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा झाले आणि त्यांनी मिशनर्यांना फैलावर घेत त्यांचावर प्रश्नांचा भडीमार केला.
३. महिलेने केलेल्या तक्रारीवरून डहाणू पोलिसांनी क्लेमेंट डी. बैला, मरीयामा टी फिलीप्स, परमजीत उपाख्य पिंकी शर्मा कौर आणि परशुराम धर्मा धिंगाडा, या ४ मिशनर्यांविरुद्ध भा.दं.वि. च्या कलम १५३, २९५, ४४८, ३४ नुसार गुन्हे नोंदवून त्यांना अटक केली.
४. ‘यापूर्वीही पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांत आदिवासी हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे हिंदू आणि धर्मांतर केलेले यांच्यात सण-उत्सव साजरे करण्यावरून वारंवार वाद निर्माण होत आहेत’, असे येथील स्थानिकांनी सांगितले. ‘पोलीस आणि प्रशासन यांनी धर्मांतराचे असे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काढावी’, अशीही मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराचा डाव हाणून पाडणार्या हिंदुत्वनिष्ठ महिला आणि गावकरी यांचे अभिनंदन ! अशा घटना रोखण्यासाठी सरकारने धर्मांतरबंदी कायदा करणेही आवश्यक ! |