जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांची आयोजित केलेली ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली !

भोपाळ (मध्यप्रदेश) – आज केवळ १० टक्के हिंदू जागृत आहेत. अशा परिस्थितीत अन्य ९० टक्के हिंदूंना हिंदु राष्ट्राविषयी जागृत करणे, हे त्यांचे दायित्व आहे. साधना आणि धर्मपालन करणार्‍या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्‍या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीत केले.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

गोवा येथे ‘दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ जून २०२२ मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांची ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ठरलेल्या समान कृती कार्यक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी ‘गायत्री शक्तीपिठा’चे श्री. प्रल्हाद शर्मा, ‘हिंदु सेवा परिषदे’चे प्रदेश सहसचिव श्री. धर्मेंद्र ठाकूर, ‘धर्मरक्षण’ संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव, उज्जैन येथील श्री. शैलेंद्र सेठ यांनी त्यांचे विचार मांडले.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी

हिंदु धर्म सेनेचे संस्थापक श्री. योगेश अग्रवाल, भारत रक्षा मंचाचे प्रांतमंत्री डॉ. एच्.पी. तिवारी, अधिवक्ता कामताप्रसाद यादव, महाराणा युवा संघटनेचे श्री. हरिश जोशी, चंडी वाहिनीच्या लता ठाकूर, श्रीराम सेनेचे श्री. कुणाल श्रीवास्तव, अधिवक्ता ब्रह्मानंद पांडे, अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. जितेंद्रसिंह ठाकूर, श्री. शुभमकांत तिवारी, डॉ. दिनेशसिंह रघुवंशी, धरोहर बचाव समितीचे श्री. कमल जैन, गायत्री शक्तीपिठाचे श्री. रामराय शर्मा

हिंदुत्वनिष्ठांनी केलेले उद्बोधन

१. मंडला येथील हिंदु सेवा परिषदेचे प्रदेश सहसचिव श्री. धर्मेंद्र ठाकूर म्हणाले, ‘‘हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाने गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन आले पाहिजे; कारण तेथे हिंदु राष्ट्र कसे असेल, हे प्रत्यक्ष अनुभवता येते. अधिवेशनामध्ये ठरवलेल्या समानसूत्री कार्यक्रमाप्रमाणे आम्ही येत्या वर्षात निश्चित प्रयत्न करू.’’

२.  भोपाळ येथील धर्मरक्षण संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव म्हणाले, ‘‘हिंदुत्वासाठी बोलणे आणि ऐकणे पुष्कळ झाले. आता आपल्याला प्रत्येक हिंदूच्या मनात हिंदु राष्ट्राचा विचार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’

३. जयपूर येथील गायत्री शक्तीपिठाचे श्री. प्रल्हाद शर्मा म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अधिवेशनानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी हिंदु राष्ट्राची आवश्यकता जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.’’

४. उज्जैन येथील श्री. शैलेंद्र सेठ म्हणाले, ‘‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी साधना आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक आहे, हे गोवा येथील अधिवेशनात शिकायला मिळाले. साधनेमुळे बिकट परिस्थितीतही स्वतःचे मनोबल टिकून रहाते, तसेच अहं अल्प असल्याने हिंदुत्वाच्या कार्यात संघटितपणा वाढेल.