अल् कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी ठार !

अमेरिकेने काबुलमध्ये घुसून ड्रोनद्वारे क्षेपणास्त्रे डागून केली कारवाई !

ओसामा बिन लादेन (डावीकडे) अल्-जवाहिरी (उजवीकडे)

काबुल (अफगाणिस्तान) – येथील शेरपूर भागात अमेरिकेच्या ड्रोनमधून डागण्यात आलेल्या २ क्षेपणास्त्रांद्वारे अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख अल्-जवाहिरी याला ठार मारले. ३१ जुलैला दुपारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः दिली. जवाहिरी येथील त्याच्या निवासस्थानाच्या सज्जामध्ये आला असता त्याच्यावर ‘हेलफायर आर्९एक्स’ची २ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हे विशेष प्रकारचे क्षेपणास्त्र असून यात स्फोट होत नाही, तर चाकूसारखे ब्लेड बाहेर पडतात आणि त्याद्वारे लक्ष्याचा भेद केला जातो, तसेच यात अन्य कुणालाही इजा होत नाही. अमेरिकेच्या या कारवाईवर तालिबान संतापले असून त्याने हे ‘दोहा करारा’चे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

१. अल् कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने वर्ष २०११ मध्ये पाकिस्तानमध्ये घुसून ठार मारल्यानंतर जवाहिरीकडे अल् कायदाचे प्रमुखपद आले होते. आता त्याला ठार मारल्यानंतर अल्-अदेल हा अल् कायदाचा प्रमुख होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

२. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ही कारवाई अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.च्या विशेष पथकाने केली. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार सत्तेवर आल्यापासून जवाहिरी काबुलमध्ये रहात होता.

३. अल्-जवाहिरीला ठार मारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले की, आम्ही जवाहिरी याला शोधून मारले. आम्ही अफगाणिस्तानातील आतंकवादावर आक्रमणे चालूच ठेवणार आहोत.

अल् जवाहिरीला नेमके कसे ठार मारण्यात आले ?

३१ जुलैला दुपारी अल् जवाहिरी घराच्या सज्जामध्ये आला होता. ‘तो प्रतिदिन येथे येतो आणि काही वेळ थांबतो’, असे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या लक्षात आले होते. अल् जवाहिरी सज्जामध्ये उभा असतांना ड्रोनच्या साहाय्याने २ हेलफायर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. घरामध्ये जवाहिरीचे कुटुंबदेखील होते; मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. विशेष म्हणजे अमेरिकेने अफगाणिस्तानमधून गाशा गुंडाळला असतांनाही तिने काबुलमध्ये घुसून ही कारवाई केली. शेरपूर भागात पूर्वी अमेरिकेचा सैन्यतळ होता. या कारवाईच्या वेळी एकही अमेरिकी सैनिक तेथे उपस्थित नव्हता.

अल् जवाहिरीवर ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वरील आक्रमणाचा आरोप

११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर करण्यात आलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी अमेरिकेने ओसामा बिन लादेन, अल्-जवाहिरी यांच्यासह अल् कायदाच्या सर्व आतंकवाद्यांना आरोपी केले होते. जवाहिरीला मारण्याचा अमेरिकेने यापूर्वीही अनेकदा प्रयत्न केला होता. वर्ष २००१ मध्ये जवाहिरी अफगाणिस्तानातील तोरा बोरा येथे लपल्याची माहिती मिळाली होती; मात्र आक्रमण  होण्यापूर्वीच तो पळून गेला होता. या आक्रमणात त्याची पत्नी आणि मुले ठार झाली होती. वर्ष २००६ मध्ये अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने जवाहिरीला मारण्यासाठी पुन्हा सापळा रचला. त्या वेळी तो पाकिस्तानातील दमडोला येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती; मात्र क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण होण्यापूर्वीच जवाहिरी तेथून निसटला होता.

भारतातील हिजाब प्रकरणावरून दिली होती धमकी  !

अल्-जवाहिरीने यावर्षी एप्रिलमध्ये ९ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने हॉलंड, फ्रान्स आणि इजिप्त हे इस्लामविरोधी देश असल्याचे म्हटले होते. यासह भारतातील हिजाबच्या वादावरविषयी वक्तव्य केले होते. जवाहिरीने  कर्नाटकात एका मुसलमान विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ एकटीने लढा दिल्यावरून तिचे कौतुक केले होते आणि भारताला धमकी दिली होती.

अल् कायदाने जूनमध्ये व्हिडिओ प्रसारित करून भारतात आक्रमण करण्याची दिली होती धमकी !

नूपुर शर्मा प्रकरणावरून अल् कायदाने ७ जून या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित करून भारताला धमकी दिली होती. अल् कायदाने बाँबस्फोट करून हिंदूंना ठार मारून महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाचा सूड उगवण्याची धमकी दिली होती. भारतातील उत्तरप्रदेश, देहली आणि गुजरात या राज्यांसह मुंबई शहरात आक्रमण करण्याची धमकी दिली होती.

संपादकीय भूमिका

‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्‍न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !