|
ठाणे, ३० जुलै (वार्ता.) – एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ या दिवशी सायंकाळी राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर ७ जुलै २०२२ या दिवशी मंत्रालयातील त्यांच्या दालनात श्री सत्यनारायणाची पूजा करत कारभाराला प्रारंभ केला; मात्र हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा आरोप ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी केला. त्यांनी या प्रकरणी ठाणे न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली असून यावर पहिली सुनावणी १ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.
‘मुख्यमंत्री पद हे घटनात्मक आहे. त्यांनी कोणताही धर्म किंवा पंथ यांची बाजू न घेता, कोणत्याही धार्मिक वादाला अनुसरून काम करणार नाही, असे असतांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार चालू करण्यापूर्वी श्री सत्यनारायणपूजा केली. हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असून अवमान करणारेही आहे. भारतीय राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्याने एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत. हे शासनाने केलेल्या नियमांचे, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही उल्लंघन आहे’, असे तक्रारीत म्हटले आहे.