‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता अत्यंत निर्भीड आणि पारदर्शक ! – ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार

सातारा, २७ जुलै (वार्ता.) – ‘सनातन प्रभात’ला असलेले ईश्वरी अधिष्ठान आणि साधू-संतांचे आशीर्वाद यांमुळे ते हिंदु जागृतीच्या कार्यात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे की, जे जगातील हिंदूंवर दैनंदिन होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम अत्यंत निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे करत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी काढले.

समर्थ सदन येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या वेळी ते बोलत होते. सनातनच्या साधिका श्रीमती वासंती लावंघरे यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला ‘लव्ह जिहाद – एक षड्यंत्र’ हा विशेषांक भेट देण्यात आला.

ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे पुढे म्हणाले की, ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूने वाचणे आवश्यक आहे. इतर वृत्तपत्रे ही व्यावसायिक असून ती मुकी आहेत. सनातननिर्मित ग्रंथ हे समस्त हिंदु समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक असून त्यानुसार कृती केल्यास समाजातील सात्त्विकता वाढून समाज नक्कीच सत्त्वगुणी होण्यास साहाय्य होईल.