शाडूच्या नावाखाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री

मूर्तीकार मूर्ती बनवतांना

पेडणे, २६ जुलै (वार्ता.) – राज्यात श्री गणेशमूर्ती बनवणार्‍या अनेक चित्रशाळांमध्ये शाडूमातीच्या नावाखाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवून त्या विकल्या जातात. ग्राहकांना आकर्षक आणि हलक्या श्री गणेशमूर्ती हव्या असतात आणि यासाठी चित्रशाळांमध्ये शाडूच्या नावाखाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती विकल्या जातात, अशी माहिती माऊसवाडा, पेडणे येथील मूर्तीकार श्री. विष्णु च्यारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. असे होण्याला या मूर्ती घेणारे ग्राहकच उत्तरदायी आहेत, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘शाडूमातीच्या नावाखाली ७० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून मूर्ती सिद्ध केल्या जातात. श्री गणेशमूर्ती सिद्ध करण्यासाठी जी माती आणली जाते, त्यात अनेक लहान दगड असतात आणि यामुळे त्या मातीपासून गुळगुळीत श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पर्यावरणासाठी घातक आहेत. ग्राहकांनी पारंपरिक मूर्तीकारांना पसंती देऊन कला टिकवून ठेवण्यासाठी हातभार लावला पाहिजे. प्रत्येकाने चिकणमातीच्या मूर्तीचेच पूजन करावे. यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण रोखले जाईल.’’

सरकारचे अनुदान मूर्तीमागे केवळ १०० रुपये !

सरकार मूर्तीकारांना प्रत्येक मूर्तीमागे १०० रुपये अनुदान देते. या अनुदानाच्या पैशांतून मूर्तीसाठी लागणारा रंगही खरेदी करता येत नाही. सरकारने हे अनुदान वाढवणे आवश्यक आहे, असे मूर्तीकार श्री. विष्णु च्यारी म्हणाले. मूर्तीकार श्री. विष्णु च्यारी गेल्या १५ वर्षांपासून वर्षाला १००च्या आसपास केवळ मातीच्या मूर्ती ग्राहकांच्या पसंतीनुसार बनवतात.

राज्यात मूर्तीकारांच्या संख्येत घट !

मूर्तीकारांना जुजबी प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान दिल्यावर राज्यातील मूर्तीकारांच्या संख्येत घट न झाल्यासच नवल ! याला गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळालाच उत्तरदायी का धरू नये ?

गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने वर्ष २०१२ पासून श्री गणेश मूर्तीकारांना अर्थसाहाय्य म्हणून मूर्तीवर अनुदान देत आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या काळात ही योजना कार्यान्वित करण्यात आली. महामंडळाकडे नोंद असलेल्या मूर्तीकारांची वर्षवार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

वर्ष २०१२ मध्ये ५२६, वर्ष २०१३ मध्ये ४९८, वर्ष २०१४ मध्ये ४८९, वर्ष २०१५ मध्ये ४५८, वर्ष २०१६ मध्ये ४७३, वर्ष २०१७ मध्ये ४२६, वर्ष २०१८ मध्ये ४१२, वर्ष २०१९ मध्ये ३९०, वर्ष २०२० मध्ये ३९० आणि वर्ष २०२१ मध्ये ३७५