अतिक्रमणाचा विळखा !

नोंद 

कोणतीही ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या अनुमतीविना मग ते भले रहिवासी असो किंवा व्यावसायिक दृष्टीने केलेले बांधकाम असो, ते प्रशासनाकडून अतिक्रमण म्हणून घोषित केले जाते. स्थानिक प्रशासनाला असे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे पूर्ण अधिकार असतात. अशाच प्रकारचे अतिक्रमण जळगाव जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर तालुक्यांत गेल्या आठवड्यात हटवण्यात आले. वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या जामनेर शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या ४०० हातगाड्या, तर अमळनेर येथील एका भागातील
१० दुकाने आणि काही रहिवासी अतिक्रमणे हटवण्यात आली. या मोहिमेत पालिका मुख्याधिकार्‍यांसह अतिक्रमण विभागप्रमुख आणि पोलीस पथक सहभागी झाले होते.

अतिक्रमण म्हटले की, प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यात संघर्ष होतो. प्रसंगी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रशासन कर्तव्य बजावण्यात, तर अतिक्रमणधारक ‘आमच्यावर अन्याय कसा झाला ?’, हे सांगण्यात व्यस्त असतात. प्रशासन कर्तव्यपूर्ती केल्याचे समाधान मानते, तर आर्थिक हानी झालेला अतिक्रमणधारक डोळे पुसून नवीन उद्योग-व्यवसायाची वाट शोधतो. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा तो आजार होऊच नये; म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे ‘अतिक्रमण’ हे एका दिवसात निर्माण होत नाही, तर ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये प्रारंभी व्यवसायानिमित्त रस्त्यालगत भूमीवर बसून विक्री, त्यानंतर हातगाडी, ४ बांबू लावून कच्चा निवारा, मग पत्रे आणि शेवटी पक्के बांधकाम असा तो प्रवास असतो. ‘अतिक्रमण हटाव मोहीम’, म्हणजे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. वाहतुकीची कोंडी होणे, अपघातांची संख्या वाढणे, स्वच्छतेस अडथळा निर्माण होणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अतिक्रमण विभाग जागा होतो. तो जर अतिक्रमणाच्या पहिल्या पायरीपासूनच जागृत झाला, तर प्रशासनावर ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम राबवण्याची वेळच येणार नाही. त्यासाठी आवश्यकता आहे, ती वेळीच कृती करण्याची आणि ती करवून घेणार्‍या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची !

दुसर्‍या बाजूला अतिक्रमणधारकाची मानसिकता ‘अल्प भांडवलात स्वत:चा व्यवसाय उभा करायचा’, ही अतिक्रमणास खतपाणी घालते. ती दूर करण्यासाठी, कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण होण्यासाठी आणि अतिक्रमणाचा विळखा दूर करण्यासाठी धर्माधिष्ठित समाज निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे, म्हणजे ‘अतिक्रमण’ काढण्याची वेळच येणार नाही !

– श्री. नीलेश पाटील, जळगाव