राज्यात कोकणासह मराठवाडा आणि विदर्भ येथे जोरदार पावसाची शक्यता !

  • ११ सहस्र लोकांना सुरक्षितस्थळी हलवले ! 

  •  १०४ नागरिकांचा मृत्यू !

मुंबई – मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे, तसेच गडचिरोली, गोंदिया यांसह कोकण आणि मुंबई येथे १८ जुलै या दिवशी सकाळपासून संततधार चालू आहे. कोकणासह विदर्भ आणि मराठवाडा येथील बहुतांश जिल्ह्यांत पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील ४ – ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो, अशी चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. गडचिरोली येथील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा या नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळपास वहात आहेत. गोदावरी आणि इंद्रावती नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. येथील नागरिकांसाठी ३५ साहाय्य केंद्रे उघडण्यात आली आहेत.

राज्यात अतीवृष्टीमुळे १०४ नागरिकांनी जीव गमावला आहे, तर १८९ प्राणी दगावले आहेत. राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करण्यात आली असून आतापर्यंत ११ सहस्र ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, नगर, बीड, लातूर, वाशिम, यवतमाळ, धुळे, नागपूर, पालघर, मुंबई उपनगर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण २३ जिल्ह्यांना अतीवृष्टीचा फटका बसला आहे. पुष्कळ प्रमाणात पीक आणि मालमत्ता यांची हानी झाली आहे. २७५ गावांतील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे.