नवी मुंबई – मागास, भटक्या आणि आदिवासींकडे प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे. या ज्ञानामुळेच प्राचीन काळात भारत समृद्ध होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. गिरीश प्रभुणे यांनी लिहिलेल्या ‘परिसांचा संग’ या पुस्तकाचे प्रकाशन वाशीमधील मराठी साहित्य, कला, संस्कृती मंडळाच्या सभागृहात झाले. त्या वेळी आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. त्यांची ही मुलाखत साप्ताहिक ‘विवेक’चे सहकार्यकारी संपादक रवींद्र गोळे यांनी घेतली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, शैलजाताई शेवडे, नवी मुंबईचे संघचालक कमलेश पटेल उपस्थित होते.
गिरीश प्रभुणे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे १०० बौद्ध कुटुंबांची पुनर्स्थापना, ‘यमगरवाडी’ (पारधी आणि आदिवासी समाजातील कुटुंबांचे पुनर्वसन), पिंपरी-चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’ हे प्रकल्प राबवले जातात. यांमुळे वंचित, आदिवासी आणि भटका समाज प्रगत होत आहे. संघावर एकीकडे हिंदुत्वाचे आरोप होत असतांना या प्रकल्पांसाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी मोठे आर्थिक आणि सामाजिक योगदान उभे केले, हे लक्षणीय आहे. यातून सामाजिक समरसता निर्माण होत आहे. जुने आणि आधुनिक कला कौशल्य, तसेच व्यवसाय यांची सांगड घालून मागास समाजाचे पुनरुत्थान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.