आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाणार्‍या आणि परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवणार्‍या सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे) !

माझ्या आयुष्यात घडणार्‍या चांगल्या-वाईट प्रसंगांत परात्पर गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझे मन स्थिर असते. परात्पर गुरुदेव सर्वज्ञ आहेत. त्यांनाच माझ्या मनाची स्थिती ज्ञात आहे. एकदा मला त्यांचा सत्संग लाभल्यावर त्यांनी मला विचारले, ‘‘आता तुम्हाला कसे वाटते ?’’ त्यांनीच मला ‘मी प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पाहू शकते’, याची जाणीव करून दिली. मी साक्षीभावाने पाहू शकले, असे माझ्या जीवनातील काही प्रसंग पुढे दिले आहेत.

(पू.) श्रीमती सुशीला मोदी

१. प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाणे

१ अ. एकदा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आमच्या घरी येणार होत्या. त्यामुळे घरातील व्यक्तींना पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवत होता. मला मात्र आनंद न जाणवता आतून शांत आणि स्थिर वाटत होते.

१ आ. मोठ्या मुलाच्या डोळ्यांना गंभीर दुखापत होऊनही काळजी न वाटणे : माझा मोठा मुलगा (श्री. शीतल, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) पोहत असतांना त्याच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. तेव्हाही मी अस्वस्थ झाले नाही. तो मला म्हणाला, ‘‘माझ्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने ‘माझी दृष्टी जाईल का ?’, अशी मला भीती वाटत आहे.’’ त्याचे बोलणे ऐकून मला कसलीही काळजी वाटली नाही. मी त्याला शांतपणे सांगितले, ‘‘चिंता करू नकोस. त्वरित आधुनिक वैद्यांचा समादेश (सल्ला) घे.’’

१ इ. नात आनंदाने नवीन अलंकार दाखवत असतांना आनंद न जाणवणे : माझ्या नातीने (कु. साक्षी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) मुंबईहून अलंकार विकत घेतले. ती मला पुष्कळ आनंदाने ते अलंकार दाखवत होती. मी तिला अलंकार चांगले असल्याचे सांगितले; पण हे सांगतांना मला आनंद जाणवत नव्हता किंवा मी भावनिकही झाले नाही. माझ्या नातीला हे कळले आणि ती मला म्हणाली, ‘‘तू दुसर्‍याच कोणत्या तरी जगात आहेस.’’

१ ई. यजमानांचे निधन झाल्यावर त्यांची फारशी आठवण न होणे : एक वर्षापूर्वी माझ्या यजमानांचे (बंकटलाल मोदी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) निधन झाले. माझ्या यजमानांशी संबंधित कोणतीही वस्तू पाहिल्यास किंवा त्यांच्याशी संबंधित काही प्रसंग घडल्यास मला त्यांची फारशी आठवण येत नाही. हे खरेच असामान्य आहे. आमचे काही नातेवाईक यजमानांविषयी बोलत असतांना मी त्यांच्या समाधानासाठी माझ्या यजमानांविषयी बोलते.

१ उ. ‘सुनांना सेवा करता यावी’, यासाठी घरातील कामे करणे : मी विसराळू असल्याने काही गोष्टी पुढे न ढकलता त्या त्वरित करण्याचा प्रयत्न करते. माझ्या सुना (सौ. स्वाती आणि सौ. राखी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)) मला ‘तुम्ही घरातील कामे का करता ?’, असे विचारतात. माझा असा विचार असतो की, ‘मी घरातील कामे केली, तर माझ्या सुनांना संगणकीय सेवेसारख्या अन्य सेवा करण्यासाठी अधिक वेळ मिळेल; कारण अशा सेवा मी करू शकत नाही.’

२. मला नातेवाइकांकडून असलेल्या अपेक्षाही आता न्यून झाल्या आहेत.

३. परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे

‘परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्या समवेत आहेत’, असे मला नेहमी जाणवते. मी बाहेर अध्यात्मप्रसारासाठी गेल्यावर कधी कधी माझा पाय घसरतो; मात्र मी कधीही खाली पडले नाही किंवा मला कधीच दुखापत झाली नाही. ‘परात्पर गुरुदेव माझी नेहमी काळजी घेतात’, याची जाणीव होऊन मला त्यांचे अस्तित्व जाणवते.

मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.

– (पू.) श्रीमती सुशीला मोदी, जोधपूर (१८.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक