१. भावजागृतीचा प्रयोग
१ अ. पंचज्ञानेंद्रिये गुरुचरणी अर्पण करणे : ‘आता आपण आपली पंचज्ञानेंद्रिये गुरुचरणी अर्पण करणार आहोत.
१. आपण प्रार्थना करत आहोत, ‘हे गुरुदेवा, तुमची अमृतवाणी आम्हाला ऐकायची आहे. आमच्या कानांना सतत तुमचीच वाणी ऐकता येऊ दे.’ त्यामुळे आपल्याला आकाशतत्त्वाची अनुभूती आली आहे आणि आपले कान गुरुमय झाले आहेत.
२. आता आपल्याला गुरुचरणांचा स्पर्श होत आहे. तो कोमल स्पर्श आपण अनुभवत आहोत, म्हणजे आता आपल्याला वायुतत्त्वाची अनुभूती येत आहे आणि आपली त्वचाही गुरुमय झाली आहे.
३. आता आपण आपले डोळे मिटले आहेत. आपण आपले अंतःचक्षू उघडून गुरुस्मरण करत आहोत. आपल्याला आता केवळ गुरुदेवच दिसत आहेत. त्यामुळे आपले डोळेही गुरुमय झाले आहेत, म्हणजेच आपल्याला तेजतत्त्वाची अनुभूती येत आहे.
४. आता आपण गुरुदेवांचे गुणगान करत आहोत. आपण म्हणत आहोत, ‘हे गुरुदेवा, तुमचे जितके गुणगान करू, तितके अल्पच आहे. तुम्ही तुमच्या कमलनेत्रांनी आमच्यावर कृपावर्षावच करत आहात. तुम्हीच आमचे सर्वकाही आहात.’ आता आपली जीभही गुरुमय झाली आहे.
५. आता आपण आपल्या श्वासाच्या समवेत ‘गुरुदेव, गुरुदेव’, असे म्हणत आहोत. त्यामुळे आपल्याला दैवी सुगंधाची अनुभूती येत आहे, म्हणजेच आपले नाक गुरुमय झाले आहे.
आता आपण आपली पंचज्ञानेंद्रिये पंचतत्त्वांची अनुभूती देणार्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करूया.
२. वरील भावजागृतीचा प्रयोग करतांना बालसाधिकांना आलेल्या अनुभूती
२ अ. कु. वैदेही सावंत (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १४ वर्षे) : ‘मी हवेत तरंगत आहे’, असे मला वाटले. मला स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडला होता. मला संपूर्ण वातावरणात लाल रंग पसरलेला दिसला आणि ‘खस’ या उदबत्तीचा सुगंध आला.’
२ आ. कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय १३ वर्षे) : ‘माझे मन पुष्कळ शांत झाले होते. मला चंदनाचा तीव्र सुगंध आला आणि माझे ध्यान लागल्यासारखे वाटले.’
२ इ. कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) : ‘माझी पंचज्ञानेंद्रिये आणि हळूहळू पूर्ण शरीर हलके होत गेले. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), फोंडा, गोवा. (५.१.२०२२)
सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे लिहिल्याने होणारे लाभ !
१. ‘जेव्हा आपण शिकायला मिळालेली सूत्रे लिहून घेतो, तेव्हाच ती आपल्या मनावर बिंबतात आणि त्यानंतर ती सूत्रे कृतीत आणता येतात.
२. ती सूत्रे वाचल्यावर आपल्याला पुन्हा सत्संग मिळतो आणि सत्संगातील गुरुदेवांची वाणी पुन्हा अनुभवता येते. या सूत्रांच्या माध्यमातून आपण गुरुमय वाणीच लिहित असतो.’
– कु. प्रार्थना पाठक, पुणे (५.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |