देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

७ जुलै २०२२ या दिवशी आपण मूळच्या देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील आणि आता खेड तालुक्यातील तपोधाम येथे रहाणाऱ्या सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांच्या साधनाप्रवासातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.                                     (भाग २)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/594569.html

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

६. सनातनच्या माध्यमातून साधना करण्यापूर्वी आलेल्या अनुभूती

६ अ. प्रवास करतांना देवाच्या कृपेने मोठ्या अपघातातून वाचणे : आम्ही ११ जण सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे गेलो होतो. तेथून परत येतांना आमच्या वाहनाला समोरून येणाऱ्या एस्.टी.ची धडक बसली. आमचे वाहन दोन पलट्या घेऊन एका झुडपावर अडकले. त्याच्यापुढे मोठा उतार होता. त्या वेळी १ – २ जणांना केवळ खरचटले. त्या वेळी ‘आम्ही देवाची विशेष अशी कोणतीही साधना करत नसतांनाही त्याचे आमच्यावर लक्ष आहे’, असे मला जाणवले.

६ आ. स्वप्नामध्ये मुलगा झोके घेत असतांना अडकून पडल्याचे दिसणे, शिवलीलामृताचे वाचन केल्यावर तो पूर्ववत् होणे, प्रत्यक्षातही मुलाच्या हातावर फोड आलेले दिसणे आणि तेव्हापासून शिवलीलामृत वाचण्यास आरंभ करणे : मी नोकरीनिमित्त चिपळूण येथे होते आणि माझी मुले देवरुख येथे होती. एकदा गुरुवारी पहाटे मला पुढील स्वप्न पडले, ‘माझा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा मंदार आडव्या दांडीला हातांनी धरून लटकून पुढे-मागे झोके घेत होता. त्या वेळी तो अकस्मात् दांडी धरलेल्या स्थितीत निश्चल थांबला. त्याच्या शरिराची कोणतीच हालचाल होत नव्हती. त्याच्याशी खेळणारी मुले मला सांगायला आली. मी त्याला बघायला गेल्यानंतरही मुलगा त्याच स्थितीत स्तब्ध होता. त्या वेळी मला आतूनच आवाज आला, ‘शिवलीलामृताचा ११ वा अध्याय वाच.’ मी स्वप्नातच तो अध्याय वाचला. वाचन पूर्ण झाल्यावर मुलगा पूर्वस्थितीला आला.’ दुसऱ्या दिवशी मी गावाला जाऊन पाहिले. तेव्हा मुलाच्या हातावर फोड आलेले दिसले. तेव्हापासून मी प्रतिदिन शिवलीलामृत वाचू लागले.

७. सनातनमध्ये येण्यापूर्वी केलेली साधना

मी दत्त आणि श्री स्वामी समर्थ यांची उपासना करत असे, तसेच प्रत्येक गुरुवारी उपवास अन् स्वामी समर्थांचेनामस्मरण करत असे.

८. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ

८ अ. सत्संगाला जाणे आणि नामस्मरण चालू करणे : वर्ष १९९५ मध्ये आमच्या अधिकोषामध्ये ७१ दिवस संप चालू होता. त्या कालावधीत रत्नागिरी येथील साधक डॉ. चंद्रशेखर प्रसादी आणि सौ. शीतल प्रसादी सनातनच्या प्रसारकार्यासाठी यायचे. त्या वेळी मी सत्संगाला जाऊ लागले आणि नामस्मरण चालू केले.

८ आ. देवरुख येथील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाच्या वेळी त्यांना टिळा लावण्याच्या सेवेतून आनंद मिळणे : देवरुख येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जाहीर प्रवचन होते. या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांना टिळा लावण्याची सेवा माझ्याकडे होती. त्या वेळी मला त्यांचे जवळून दर्शन झाले. त्या वेळची माझी स्थिती मला आठवत नाही; परंतु माझ्या मनाला आनंद मिळाला. परात्पर गुरु डॉक्टरांवर आधीपासूनच माझी श्रद्धा होती.

८ इ. कुलदेवतेचे नामस्मरण करतांना आरंभी विकल्प येणे; परंतु त्यानंतर निश्चय करून सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे : पूर्वी मी स्वामी समर्थांची भक्ती करत असल्यामुळे सनातनच्या सत्संगात सांगितल्याप्रमाणे कुलदेवतेचे नामस्मरण करण्यासाठी ६ मास लागले. कुलदेवतेच्या नामस्मरणाला आरंभ केल्यावर ‘हे योग्य आहे का ?’, याविषयी माझ्या मनात विकल्प येत राहिले. त्यानंतर ठाम निश्चय करून मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला.

९. केलेल्या विविध सेवा

९ अ. अधिकोषातील सहसाधिकेच्या समवेत विविध सेवा करणे : मी नोकरी करत असलेल्या अधिकोषात माझ्या सहकारी आणि साधिका श्रीमती सुजाता सावंत होत्या. कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतर आम्ही दोघीही सेवेसाठी बाहेर पडायचो. तेव्हा आम्ही ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, अर्पण मिळवणे, विज्ञापन घेणे, संपर्क करणे’ इत्यादी सेवा करायचो. त्या वेळी माझ्याकडे बोलण्याचे कौशल्य नव्हते. त्यासाठी श्रीमती सुजाता सावंत यांनी मला साहाय्य केले.

९ आ. तपोधाम येथे राहून विविध सेवा करणे : मी तपोधाम येथे येऊन १० वर्षे झाली. सध्या येथे मी, श्री. मेघश्याम आंबेकरकाका (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि सौ. कल्पना चव्हाणकाकू, असे ३ साधक आहोत. साधना किंवा सेवा यांविषयी कुठल्याही अडचणी आल्या, तर आम्ही एकमेकांना विचारतो आणि नियोजन करतो. आम्ही ‘आंब्यांवर फवारणी करणे, आंबे गोळा करणे, ते खोक्यात भरून इतर आश्रमांत पाठवणे, काजूच्या बिया गोळा करून पाठवणे, चिकू आणि लिंबे काढून पाठवणे’ इत्यादी सेवा करतो. आम्ही ‘स्वरक्षण प्रशिक्षण, प्राणायाम, नामजपादी उपाय’, इत्यादींचे गांभीर्य एकमेकांच्या लक्षात आणून देतो.

(क्रमशः उद्याच्या अंकात)

– (पू.) श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ७२ वर्षे), देवरुख, रत्नागिरी. (७.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक