सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या पू. (कु.) रत्नमाला दळवी !

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

१३ जुलै २०२२ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

१.७.२०२२ या दिवशी आपण ‘पू. (कु.) रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे)  यांचा सनातन संस्थेशी संपर्क कसा झाला ? त्यांचा पूर्णवेळ साधनेला आरंभ कसा झाला ? आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाचा त्यांना मिळालेला लाभ’ यांविषयी पाहिले. आजच्या भागात ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांना कसे घडवले? आणि साधकांच्या साधनेची घडी बसवण्यात पू. (कु.) रत्नमाला यांनी केलेले प्रयत्न’ पहाणार आहोत.

मागील लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/592895.html

पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी

६. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी स्वभावदोषांचे निर्मूलन आणि गुणसंवर्धन करण्यास शिकवणे

६ आ. अहं-निर्मूलन होण्यासाठी केलेले प्रयत्न : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करतांना आढावासेवक जे सांगतील, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न देवानेच माझ्याकडून करवून घेतला. प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना एखादा स्वभावदोष किंवा एखादी चूक कुणी लक्षात आणून दिल्यावर ती स्वीकारतांना किंवा त्यावर मात करतांना माझ्या मनाचा कधी संघर्ष झाला नाही.

६ इ. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘देवच सेवा देतो आणि त्यासाठी आवश्यक असलेली क्षमताही तोच देतो’, असे सांगून देवावरची श्रद्धा वाढवल्यामुळे सेवेचा ताण न्यून होणे : मी करत असलेल्या सेवेत नेहमी ‘साधकसंख्या अल्प आणि सेवा अधिक’, अशी स्थिती असते. त्यामुळे पूर्वी सेवा प्रलंबित राहिल्यावर मला पुष्कळ ताण यायचा. मी रात्री पुष्कळ वेळ जागून त्या सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये मला सांगितले, ‘‘देवच सेवा देतो आणि ती सेवा करण्याचे बळही तोच देतो. ‘ती सेवा करण्याची आपली क्षमता आहे कि नाही ?’, हेही देवालाच ठाऊक असते. त्यामुळे आपण केवळ त्यालाच शरण जायचे.’’ अनेक प्रसंगांच्या माध्यमातून त्यांनी ते माझ्या लक्षातही आणून दिले. त्यामुळे हळूहळू देवाच्या कृपेने मला सेवेचा ताण येण्याचे प्रमाण न्यून होत गेले. ही परिस्थिती देवानेच ‘माझी सकारात्मकता आणि देवावरची श्रद्धा वाढवण्यासाठी निर्माण केली होती’, असे आता माझ्या लक्षात येते.

६ ई. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी समष्टी सेवेसाठी व्यापक विचार करता येण्यासाठी केलेले मार्गदर्शन !

६ ई १. ‘सहसाधकांमुळे साधना आणि सेवा करू शकत आहे’, याची जाणीव होऊन इतरांना समजून घेता येऊ लागणे : साधकांकडून चुका झाल्यावर त्यांच्याशी बोलतांना माझी चिडचिड होत असे आणि ‘त्याच त्याच चुका त्यांच्याकडून पुन्हा होऊ नयेत’, यासाठी त्यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी’, असा विचार होत असे. तेव्हा माझा साधनेच्या दृष्टीने अल्प आणि कार्याच्या दृष्टीने अधिक विचार असायचा. त्यानंतर एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये सद्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘सहसाधकांचे साधनेतील महत्त्व’ या विषयावर चिंतन करून यायला सांगितले. तेव्हा ‘सहसाधकांमुळे मी साधना आणि सेवा करू शकत आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘देव सर्वांनाच साधनेत साहाय्य करत आहे’, असा माझ्याकडून विचार व्हायला लागला. त्यानंतर ‘सहसाधकांशी बोलण्यापूर्वी, बोलतांना आणि बोलल्यानंतर माझ्या मनात कोणते विचार चालू आहेत ?’, याचा मी अभ्यास करायला आरंभ केला. त्यामुळे ‘मी आणखी काय करू शकले असते ?’, असा विचार मला करता यायला लागला. त्यामुळे माझ्या वागण्यात सहजता येऊ लागली.

६ ई २. पूर्वी स्वभावदोषांमुळे केवळ स्वतःकडील सेवेला प्राधान्य देणे : माझ्याकडून माझ्या सेवेपुरताच विचार व्हायचा. मी अनेक वर्षांपासून सेवा करत आहे; पण मी स्वतःच्या सेवेची एक चौकट करून घेतली होती. सेवा करतांना स्वतःकडे जेवढी सेवा आहे, तेवढीच सेवा मी करत होते. उत्तरदायी साधकांनी त्या व्यतिरिक्त इतर कोणतीही सेवा सांगितली, तरी मी ती सेवा करण्यास कधीच सिद्ध होत नसे. यामध्ये ‘पुढाकार न घेणे, दायित्व न घेणे, साधकांमध्ये न मिसळणे, नियोजनाचा अभाव’, असे माझ्यातील अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू कार्यरत होते अन् माझ्या ते लक्षातही येत नव्हते.

६ ई ३. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘सेवेतील दायित्व जेवढे अधिक, तेवढी साधनेची संधी अधिक’, हे सूत्र मनावर बिंबवणे : सद्गुरु राजेंद्रदादा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात अनेक प्रसंगांच्या माध्यमातून मला ‘सेवेचे दायित्व किती आहे ?’, याची जाणीव करून द्यायचे. ‘जितके दायित्व अधिक, तितकी साधनेची संधी अधिक’, हे त्यांनी माझ्या मनावर बिंबवले. त्यामुळे माझ्यातील दायित्व घेण्याची जाणीव पुष्कळ प्रमाणात वाढली. नंतर ‘माझी सेवा करून मी अन्य सेवा करू शकते’, अशी विचारप्रक्रिया होण्यास आरंभ झाला. त्यामुळे काही कालावधीने उत्तरदायी साधकांनी सांगितल्यावर मी आमच्या सेवेच्या ठिकाणच्या स्वच्छतेच्या सेवेचे दायित्व घेतले. इथूनच नियोजन करण्याच्या सेवेतून समष्टीमध्ये सहभागी होण्यास आरंभ झाला.

६ ई ४. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘व्यापकत्व वाढण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, ते सांगून प्रयत्नांना योग्य दिशा देणे : व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सद्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘व्यापकत्व वाढायला हवे’, याची जाणीव करून दिली आणि ‘त्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक सेवा माझी आहे’, या विचाराने समोर आलेली कोणतीही सेवा किंवा दुसर्‍याने सांगितलेली सेवा सहजतेने स्वीकारता आली पाहिजे. तुम्हाला कितीही घाई असली किंवा कितीही तातडीची सेवा असली, तरी सहजतेने इतरांना साहाय्य करता आले पाहिजे. एखादा साधक काही अडचण सांगायला किंवा काही विचारायला आल्यावर त्याला प्रथम प्राधान्य देता आले पाहिजे. नेहमी समष्टीचा विचार अधिक व्हायला हवा.’’ सद्गुरु राजेंद्रदादांनी प्रयत्नांची अशी दिशा दिल्याने माझ्याकडून तसे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे मला व्यापक होता येऊन समष्टी सेवा करण्यातील आनंद अनुभवता येऊ लागला.

६ ई ५. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आश्रमातील सर्व साधकांविषयी जवळीक वाटू लागणे : जेव्हा मी आश्रमातील अन्य सेवांमधील काही सेवा बघायला आरंभ केला, तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांनी मला सांगितले, ‘‘जेवढी तुमची सेवा तुम्हाला आपली वाटते, तेवढीच अन्य सेवाही आपली वाटली पाहिजे.’’ याचा परिणाम असा झाला की, जरी कार्याच्या अनुषंगाने मला तेवढा वेळ देता येत नसला, तरी अन्य विभागातील सेवा आणि साधक यांच्याविषयी माझ्या मनात पुष्कळ जवळीक निर्माण झाली. माझ्या सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडून जसे प्रयत्न होतात, तसेच अन्य सेवांतील अडचणी सोडवण्यासाठीही प्रयत्न होऊ लागले.

६ उ. सेवांचे नियोजन करतांना आणि गुणसंवर्धन होण्यासाठी केलेले प्रयत्न

६ उ १. स्वतः त्या सेवेचा अभ्यास करणे

६ उ २. सेवेतील सर्व साधकांना समवेत घेऊन सेवेचे नियोजन करणे : ‘या सेवेचे नियोजन कसे करूया ?’, असे साधकांना विचारून त्यांचे मत समजून घेऊन सहसाधकांनी सांगितलेल्या पर्यायांचा विचार करून आवश्यक तिथे पालट केले. सहसाधकांना समवेत घेऊन सेवेचे नियोजन केल्याने १ – २ वर्षांतच अन्य साधकही छोट्या छोट्या सेवांचे दायित्व घेण्यास आणि त्या सेवेचे नियोजन करायला िशकले.

६ उ ३. सहसाधकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या सेवेचे नियोजन करणे : अधिक कालावधीच्या सेवेचे नियोजन करतांना ‘सहसाधक त्या कालावधीत घरी जाणार आहेत का ?’ किंवा त्यांना येऊ शकणार्‍या अडचणी विचारून घेतल्यामुळे सहसाधक आणि दायित्व साधक यांच्यामध्ये वेगळेपण राहिले नाही. त्यामुळे साधकांकडून कोणत्याही सेवेचे नियोजन सहजतेने स्वीकारले जाऊ लागले.

६ उ ४. सेवेची कार्यपद्धत ठरवतांना सर्वांचा विचार घेणे : सेवेची एखादी कार्यपद्धत ठरवल्यानंतर ती संबंधित सर्वांना वाचायला देऊन त्यांनी सांगितलेले पालट आवश्यकतेनुसार केल्याने संघटितपणा वाढण्यास साहाय्य झाले.

६ उ ५. नवीन सेवा आधी स्वतः करून पहाणे : एखादी नवीन सेवा आधी स्वतः करून मग सहसाधकांना करायला सांगितली. असे केल्याने ‘त्या सेवेमध्ये काय अडचण येऊ शकते ?’, हे आधीच माझ्या लक्षात येऊन त्या अडचणीवर उपाययोजना काढणे सोपे झाले.

६ उ ६. साधकांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा देणे : साधकांची क्षमता, त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं, त्यांना होणारे शारीरिक अन् अनिष्ट शक्तींचे त्रास, हे सर्व लक्षात घेऊन त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न केला. एकाच प्रकारची सेवा करायला दोन साधकांना वेगवेगळा कालावधी लागत असेल, तर स्वतः त्या सेवेचा अभ्यास करून सेवा योग्य वेळेत होण्यासाठी साधकांना साहाय्य केले.

६ उ ७. साधकांना त्यांच्याकडून होणार्‍या चुकांची जाणीव करून देणे : साधकांच्या सेवा आणि नामजपादी उपाय यांचे नियोजन करून देऊन ‘त्यानुसार सेवा होत आहे ना ?’, हे पहायला आरंभ केला. साधकांकडून नियोजनाप्रमाणे सेवा न झाल्यास त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यात जे चुकले असेल, त्याची साधकांना जाणीव करून देऊ लागले.

६ उ ८. सेवा वेळेत आणि परिपूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न

६ उ ८ अ. सेवा वेळेत होण्यासाठी साधकांच्या अडचणी सोडवण्याला प्राधान्य देणे आणि सेवा प्रलंबित रहात असतील, तर त्यांना साहाय्यासाठी आणखी एक साधक जोडून देणे : सेवा पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक लक्षात घेऊन सेवेचे नियोजन (‘रिव्हर्स’ प्लानिंग) करून सेवा वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले आणि साधकांकडून तसे प्रयत्न करवून घेतले. साधकांच्या सेवेमध्ये येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. एखाद्या साधकाची सेवा प्रलंबित राहू लागली, तर लगेचच त्याला साहाय्यासाठी दुसरा साधक जोडून दिला. साधकांकडून होणार्‍या चुकांची त्यांना स्पष्टपणे जाणीव करून दिली. एखाद्या साधकाकडून पुनःपुन्हा त्याच चुका होत असतील, तर त्याला शिक्षापद्धतीचा अवलंब करायला सुचवले, तसेच मी माझ्याकडून झालेल्या चुकाही साधकांना सांगितल्या.

६ उ ८ आ. अधिक व्याप्ती असलेल्या सेवा एकत्रितपणे करणे : गुरुपौर्णिमेनंतर एक सेवा वर्षातून एकदाच करायची असते; परंतु तिची व्याप्ती पुष्कळ असते आणि त्यामध्ये बारकावेही असतात. साधक एकेकट्याने ही सेवा करत असल्यामुळे या सेवेला पुष्कळ अधिक वेळ लागायचा. त्यामुळे अन्य सेवांवरही परिणाम व्हायचा. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला ‘ही सेवा सर्वांनी मिळून एकत्रित करू शकतो’, हे सुचले. त्याप्रमाणे ३ – ३ साधकांच्या जोड्या केल्याने ही सेवा गतीने होऊ लागली. त्यामुळे नियमितच्या सेवेवरही परिणाम झाला नाही आणि सेवा करतांना कुणाला कंटाळाही आला नाही. त्यामुळे सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.

६ उ ८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे आणि साधकांकडूनही तसे प्रयत्न करवून घेणे : पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये’, यासाठी मी मधे मधे साधकांना चुकांची जाणीव करून देत होते. ‘गुरुदेवांनी ज्या विश्वासाने आपल्याला सेवा दिली आहे, तो विश्वास संपादन करायचा आहे’, याची स्वतः जाणीव ठेवून सहसाधकांनाही तशी जाणीव करून देत होते.

(क्रमशः)

– (पू.) सुश्री (कु.) रत्नमाला दळवी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२२)