प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली सचिव अन् उपाध्यक्ष यांची भेट !

भाजपची बहुमत चाचणीची पूर्वसिद्धता !

सुधीर मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तानाट्याची ३० जूनला कसोटी लागणार आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. विधान भवनातील व्यवस्थेसंदर्भात भाजपने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर दायित्व सोपवले आहे. या संदर्भात दरेकर आणि मुनगंटीवार यांनी ३० जूनला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधान भवन सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली.

सुधीर मुनगंटीवार पत्रकारांना म्हणाले की,

१. प्रवीण दरेकर आणि मी स्वत: नरहरी झिरवाळ अन् राजेंद्र भागवत यांची भेट घेऊन आसन व्यवस्थेच्या संदर्भात, तसेच आजारी आमदारांच्या वैद्यकीय व्यवस्थेविषयी चर्चा केली. उद्याच्या विश्वासदर्शक ठरावासाठी येथील सुरक्षा व्यवस्था चोख असावी, अशी मागणी केली. त्यांनी व्यवस्था चोख ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

२. वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमांतून काही लोक जे धमक्या देत आहेत, त्यावरून लोकशाहीच्या मंदिरात कोणत्याही पद्धतीचे आक्रमण कुणी करण्याचा प्रयत्न करू नये, ही गोष्ट आम्ही विधानसभा उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या दृष्टीस आणून दिली.

३. सुरक्षेचे दायित्व पोलीस आणि प्रशासनाचे असून भाजपचे नाही. येथे कुणीही गुंडगिरी करू नये. यावर पोलीस विभागाचे अधिकारी योग्य ती कृती करतील, असा विश्वास आहे.

बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची राज्यपालांकडे भाजपची मागणी !

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याने सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी करणारे पत्र भाजपने २८ जूनच्या रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे २८ जूनला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुंबई येथे रात्री परतले आहेत. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.