सांगली, २७ जून (वार्ता.) – जनसंघाचे अध्यक्ष या नात्याने डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये प्रवेश केला. आपल्या देशाच्या एका राज्यात भारतियांना प्रवेश करण्यासाठी अनुमती घ्यावी लागणे, हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेच्या कालावधीत डॉ. मुखर्जींचे निधन झाले. शामाप्रसादांच्या बलीदानामुळे काश्मीर भारतात राहिले, याचे स्मरण सर्व भारतियांनी ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री. प्रकाश बिरजे यांनी काढले. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, संघटन सरचिटणीस दीपक माने, माजी आमदार नितीन राजे शिंदे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, माजी महापौर सौ. संगीता खोत, नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई यांसह अन्य उपस्थित होते.