सातारा, २७ जून (वार्ता.) – वाई शहरातील रस्त्यावर भर पावसात डांबरीकरण करण्याची मनमानी ठेकेदार करत असून हे काम तातडीने थांबवण्यात यावे, अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी वाई पालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. (जे इतरांना लक्षात येते, ते प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ? – संपादक)
या वेळी शिवसेनेचे वाई तालुका उपप्रमुख विवेक भोसले, शहरप्रमुख गणेश जाधव, किरण खामकर आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या वतीने आरोग्य अधिकारी नारायण गोसावी यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, संबंधित ठेकेदार हा नगरपालिका आणि शासनाच्या निधीचा चुकीचा उपयोग करत आहे. या कामाचे देयक संबंधित ठेकेदारास देण्यात येऊ नये; अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी मोरे यांच्याशी भ्रमणभाषवर संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘संबंधित ठेकेदारास जानेवारी २०२२ मध्ये कामाचे आदेश दिलेले होते. त्यानंतर २ वेळा नोटीसही बजावली होती; मात्र त्याने कोणतीही दाद दिली नाही. त्यामुळे सध्या पावसात केलेले काम हे ठेकेदाराचे वैयक्तिक उत्तरदायित्व आहे. त्याला नगरपालिका उत्तरदायी नाही. याविषयी योग्य ती चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल.’’