रामनाथी (गोवा) – भारतात प्रवास करतांना आम्ही जिल्हा पातळीवर ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित केली. यावर्षी कोरोनानंतर १२ राज्यांतील (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, देहली, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, हरियाणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश) ३६ जिल्ह्यांत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशने’ आयोजित करण्यात आली.
यात २ सहस्र १०० एवढ्या स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वच राज्यांतील आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्वदेशी अशा विविध क्षेत्रांतील संस्थांना हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी व्याख्याने आयोजित केली. हिंदुत्वाविषयी मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. सामाजिक माध्यमांनंतर राष्ट्रीय प्रसारमाध्यमेही उघडपणे हिंदुत्वाच्या सूत्रावर बोलू लागली आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संपर्क अभियान’ या विषयावर बोलत होते.