आयुर्वेद काय सांगतो ?
…पहाटे लवकर का उठावे ?
सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.
ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने आरोग्य चांगले रहाते !
‘आयुर्वेदामध्ये ‘ब्राह्ममुहूर्तावर उठावे’, असे सांगितले आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्याेदयापूर्वी ९६ ते ४८ मिनिटांचा काळ. या वेळेत उठल्यास शौचाची संवेदना आपोआप निर्माण होऊन पोट साफ होते. ज्यांना ब्राह्ममुहूर्तावर उठणे शक्य नाही, त्यांनी न्यूनातिन्यून सकाळी ७ वाजेपर्यंत तरी उठावे. हळूहळू लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. सूर्याेदयानंतर झोपून राहिल्यास अंग जड होणे, आळस येणे, पचनसंस्था बिघडणे, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास उद्भवू शकतात. पहाटे हवा शुद्ध असल्याने त्या वेळी व्यायाम केल्याने त्याचाही अधिक लाभ होतो.
ऋषी सूर्यगतीप्रमाणे ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी प्रातर्विधी, स्नान आणि संध्या करत. त्यानंतर वेदाध्ययन आणि कृषीकर्म करत अन् रात्री लवकर झोपत. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य होते; परंतु आज लोक निसर्गनियमांच्या विरुद्ध वागत असल्यामुळे त्यांचे शरीरस्वास्थ्य बिघडले आहे. पशूपक्षीसुद्धा निसर्गनियमांनुसार दिनचर्या करतात.
– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज
ब्राह्ममुहूर्तावर का उठावे ?१. ‘या काळात निराभिमानता असणाऱ्या दैवी प्रकृतीच्या जिवांचा संचार होतो. २. हा काळ सत्त्वगुणप्रधान असतो. सत्त्वगुण ज्ञानाची अभिवृद्धी करणारा आहे. या काळात बुद्धी निर्मळ आणि प्रकाशमान असते. ‘धर्म’ आणि ‘अर्थ’ यांविषयी करावयाची कामे, वेदांत सांगितलेली तत्त्वे (वेदतत्त्वार्थ) यांचे चिंतन, तसेच आत्मचिंतन यांसाठी ब्राह्ममुहूर्त हा उत्कृष्ट काळ आहे. ३. या काळात सत्त्वशुद्धी, कर्मरतता, ज्ञानग्रहणता, दान, इंद्रियसंयम, तप, शांती, भूतदया, निर्लोभता, निंद्यकर्म करण्याची लज्जा, स्थैर्य, तेज आणि शौच (शुद्धता) हे गुण अंगी येण्याचे कार्य सुलभ होते. ४. या काळात डास, ढेकूण आणि पिसवा क्षीण होतात. ५. या काळात वाईट शक्तींचे प्राबल्य क्षीण होते.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी |
दिवसा झोपणे हे आरोग्य बिघडण्याचे मोठे कारण !दुपारची झोप कशी सोडावी ?दिवसा झोपणे, विशेषतः दुपारी जेवल्यावर झोपणे, हे आरोग्य बिघडण्याचे मोठे कारण आहे. ‘मी बाकी काहीही पथ्य पाळीन; पण मला दुपारची झोप बंद करण्यास सांगू नका !’, असे सांगणारे पुष्कळ रुग्ण व्यवहारात आढळतात. इतर सर्व पथ्ये पाळून दुपारी झोप घेतली, तर इतर पथ्ये पाळण्याचा काही लाभ होत नाही, हे जेव्हा रुग्णाला उमजते, तेव्हाच असे रुग्ण दुपारची झोप सोडण्यास सिद्ध होतात. थोडक्यात आरोग्य मिळवायची प्रामाणिक इच्छा असेल, तर दुपारची झोप सोडायलाच हवी. दुपारी जेवल्यावर झोप येत असल्यास दुपारी थोडे अल्प जेवा !१. जेव्हा जेवणाचे प्रमाण अधिक होते, तेव्हा शरिराला पचनासाठी अधिक शक्ती खर्च करावी लागते. जेवणानंतर पचन हेच शरिराचे प्राधान्याचे कार्य असल्याने अन्य अवयवांचा रक्तपुरवठा न्यून होऊन पोटाकडे रक्तपुरवठा वाढवला जातो. यात मेंदूचाही रक्तपुरवठा काही अंशी न्यून झाल्याने बऱ्याच जणांना जेवणानंतर झोप येते. जेवल्यावर अन्नपचनासाठी जास्त रक्तपुरवठा पोटाच्या आतड्यांकडे, तर अल्प रक्तपुरवठा मेंदूला होतो. (या काळात अल्प काळ विश्रांती घ्यावी.) २. ज्यांना श्रमांमुळे झोपावेसे वाटत असेल, त्यांनी जेवणानंतर काही काळ आडवे पडून विश्रांती घ्यावी; पण झोप लागू देऊ नये. ३. ज्यांना जेवण अधिक केल्याने झोप येत असेल, त्यांनी झोप येऊ नये, यासाठी मिताहार घ्यावा, म्हणजे थोडी भूक शिल्लक ठेवून जेवावे. असे जेवल्याने शरिरावर अन्न पचवण्यासाठी अन्य अवयवांची शक्ती वापरण्याची पाळी येत नाही आणि झोपही येत नाही. ४. वरील उपाय करूनही ज्यांना दुपारची झोप आवरता येत नाही, त्यांनी दुपारी बसल्या बसल्या झोप घ्यावी. वामकुक्षी म्हणजे जेवण झाल्यावर शतपावली करून अधिकाधिक २० मिनिटे डाव्या कुशीवर पडून रहाणे. वामकुक्षी म्हणजे गाढ आणि अधिक काळ झोपणे नव्हे. |
रात्री जागरण का करू नये ?१. रात्री जागरण केल्याने शरिराच्या धातूंमध्ये रूक्ष गुण, म्हणजे कोरडेपणा वाढतो. यामुळे शरिरातील पाण्याचे, म्हणजे आप महाभूताचे (पाण्याचा) अंश न्यून होतात. २. शरिरातील आप महाभूत अग्नीचे (पचनशक्तीचे) नियमन करत असते. आपमहाभूत न्यून झाल्याने अग्नि एकदम भडकतो आणि पचनाच्या वेळेस त्याच्या तावडीतील अन्न करपवून टाकतो. यामुळे करपट ढेकर येतात. पचन बिघडल्याने अग्नीला मिळणारे पोषण न्यून होते. यामुळे अग्नि मंद होतो. याचा परिणाम म्हणून पचन पुन्हा बिघडते. खाल्लेले अन्न नीट न पचता आंबू लागते आणि आंबट ढेकर येऊ लागतात. याला ‘पित्त होणे’ किंवा ‘आम्लपित्त’ असे म्हणतात. असे सातत्याने होत राहिले की, अन्नरस (घेतलेल्या आहाराचे पचन झाल्यावर शरिरात शोषला जाणारा रस) आंबूस होतो. अशा अन्नरसाने शरिराचे पोषण झाल्याने शरिरातील सर्व धातूंनाच आम्लता प्राप्त होते. यामुळे शरिरात उष्णता जाणवणे, शरीर शिथिल होणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, चक्कर येणे, अंगाला खाज येणे, त्वचेवर पित्ताच्या गांध्या उठणे, रक्तातील हिमोग्लोबिन न्यून होणे, शरिरावर ठिकठिकाणी पुळ्या किंवा फोड येणे, सूज येणे, हाडे झिजणे, थकवा येणे आदी विकार होऊ लागतात. ३. शरिरातील आप महाभूत न्यून झाल्याने मलातील पाण्याचा अंशही न्यून होतो. त्यामुळे त्याचे पुढे सरकणे मंदावते. मल शुष्क झाला, तर तो तिथेच थबकून रहातो आणि बद्धकोष्ठता निर्माण होते. शरिरात डोक्यापासून पायांपर्यंत सतत वात वाहत असतो. मल थबकून राहिल्याने वाताच्या मार्गात अडथळा येतो आणि तो उलट फिरतो. असा उलट फिरलेला वायू पोटात गेला, तर तेथे पचन होत असलेले, म्हणजे अग्नीने युक्त असे अन्न वरच्या बाजूला ढकलू लागतो. यामुळे छातीत किंवा घशात जळजळ होते. वायू पोटात घुटमळत राहिला, तर पोटात दुखू लागते. याला ‘वायगोळा’ किंवा ‘उदरातील गुल्म’ असे म्हणतात. हा वायू हृदयात गेला, तर हृदयाचे विकार; फुप्फुसांत गेला, तर दमा किंवा खोकला यांसारखे श्वसनसंस्थेचे विकार; डोळ्यांत गेला, तर डोळ्यांचे विकार; डोक्यात गेला, तर डोकेदुखी किंवा डोक्याच्या रक्तवाहिन्यांत जाऊन त्यामुळे तेथील एखादी रक्तवाहिनी फुटली, तर मेंदूत रक्तस्राव होऊन पक्षाघात यांसारखे विकार होऊ शकतात. प्रतिदिनचे जागरण हे अशा प्रकारे अनेक रोगांचे कारण ठरू शकते. जोपर्यंत जागरण बंद करत नाही, तोपर्यंत कारण चालूच रहात असल्यामुळे हे रोग बरे होत नाहीत. विकार बरे होऊन शरीर निरोगी ठेवायचे असेल, तर जागरण टाळायलाच हवे. तरुणपणी किंवा शरीरबळ चांगले असेपर्यंत जागरण पचून जाते; परंतु सातत्याने असे होत राहिले, तर शरीरबळ क्षीण होऊ लागते आणि वर दिलेले किंवा अन्यही विकार उद्भवू लागतात. यामुळे रात्री जागरण करणे कटाक्षाने टाळावे. |
झोपतांना पाळावयाचे आचार
रात्रीची झोप पूर्ण झाल्याची लक्षणे ! रात्रीची झोप पूर्ण झाल्यावर सकाळी आपोआप जाग येते. उठल्यावर मन उत्साही आणि प्रसन्न असते. डोळ्यांवर झापड नसते. |
#Ayurved # आयुर्वेद # Ayurveda