राष्ट्रपतीपदाची निवडणूक !

भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल २४ जुलै या दिवशी संपणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रमही घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत १८ जुलैला मतदान आणि २१ जुलैला नवीन राष्ट्रपतींची घोषणा केली जाईल.

राष्ट्रपती पदाचे उमेदवार : श्री. यशवंत सिन्हा आणि श्रीमती द्रौपदी मुर्मू

विरोधी पक्षाने माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली असून भाजपने सगळ्यांनाच चकित करत कधीच चर्चेत नसलेल्या ओडिशा येथील आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घोषित झाल्यावर देहली येथे येण्यापूर्वी पुरंदेश्वरी शिव मंदिरात जाऊन प्रारंभी तेथील मंदिरात स्वत: झाडू घेऊन स्वच्छता केली. यानंतर त्यांनी नंदीचे दर्शन घेतले आणि भगवान शंकराची पूजा केली. देशातील सर्वाेच्चपदी ज्यांची नेमणूक होणार आहे, त्यांची ही कृती हिंदूंसाठी निश्चितच सुखावणारी आहे !

‘रबर स्टँप’ राष्ट्रपती नको !

स्वातंत्र्यानंतर राजेंद्रप्रसाद आणि सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन् अशी काही मोजकी उदाहरणे सोडल्यास त्यानंतरच्या राष्ट्रपतींची आपल्याला नावेही लक्षात नाहीत. तत्कालीन सरकार निधर्मी असल्यामुळे साहजिकच निधर्मी विचारधारा जोपासणारी व्यक्तीच या पदावर आरूढ होत असे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून तर या पदाकडे एक ‘रबर स्टँप’ म्हणूनच पहाणे चालू झाले. सरकारकडून येणाऱ्या विधेयकांवर स्वाक्षरी करणे इतकेच मर्यादित अधिकार काँग्रेसच्या कार्यकाळातील राष्ट्रपतींकडे होते. वस्तुत: हिंदूबहुल भारतात सर्वाेच्च अशा पंतप्रधान, राष्ट्रपती यांसारख्या पदांवर हिंदुहिताचाच विचार करणारी व्यक्ती अपेक्षित आहे; मात्र काँग्रेसने ते होऊ दिले नाही ! नंतरच्या काळात थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती झाले. त्यामुळे या पदाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले.

या वेळच्या राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्ष कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देणार ? याविषयी उत्सुकता होती. विरोधी पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे फारुक अब्दुल्ला यांची नावे सुचवली होती. त्यांनी नकार दिल्यावर तृणमूल काँग्रसेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांचे नाव ममता बॅनर्जी यांनी पुढे केले. यशवंत सिन्हा हे पूर्वी भाजपचे नेते होते; मात्र नंतर बंडखोरी करत ते तृणमूल काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले.

शिवमंदिराची स्वच्छता करतांना श्रीमती द्रौपदी मुर्मू

‘या पदावर आरूढ झालेल्या व्यक्तीकडून सामान्य जनतेच्या काय अपेक्षा आहेत ?’, असे विचारल्यास तो संशोधनाचा विषय ठरेल. यास प्रमुख कारण की, भारतात लोकशाही आहे. यात पंतप्रधानपदाला अधिक महत्त्व असते. येथे राष्ट्रपतीपदावरील व्यक्तीला मर्यादित अधिकार आहेत. सत्ताधारी पक्ष स्वतःच्या विचारसरणीची व्यक्ती या पदावर कशी आरूढ होईल ? यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे ‘या पदावर कोण आरूढ होईल ?’, याविषयी म्हणावी तितकी उत्सुकता जनतेमध्ये नसते. त्यातही अवाढव्य राष्ट्रपती भवन, तेथील राजेशाही थाट पहाता राष्ट्रपतींच्या दैनंदिन कार्यक्रमावर खर्च होणारा पैसा हा जनतेच्या खिशातून कापला जातो. केंद्रात सत्तेत असलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यांची आवश्यकता आपण जाणू शकतो; ‘मात्र राष्ट्रपतींच्या विदेश दौऱ्याची फलनिष्पत्ती काय ?’, हा चर्चेचा विषय होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांच्या मंदिर स्वच्छ करण्याच्या कृतीमुळे त्यांच्यातील साधेपणा लक्षात आला. सध्या शासन किंवा प्रशासन यात निःस्पृह आणि निःस्वार्थ लोकांची वानवा आहे. हल्ली एखादे पद मिळाल्यास आणि त्या अनुषंगाने आलेले अधिकार मिळाल्यास त्याचा नेहमीच जनतेच्या हितासाठी वापर होतो, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. या पार्श्वभूमीवर मुर्मू यांनी केलेल्या स्वच्छतेच्या कृतीमुळे त्यांच्याविषयी लोकांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत !