लोणंद (जिल्हा सातारा) येथील वीज वितरणच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना पकडले !

सातारा, २१ जून (वार्ता.) – खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील वीज वितरण आस्थापनाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला १२ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शरद ओंकार असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

शरद ओंकार हे वीज वितरण कार्यालयात काम करतात. शेतीसाठी नवीन वीजजोडणी घेण्यासाठी तक्रारदार त्यांच्याकडे आला होता. तेव्हा ओंकार यांनी तक्रारदार यांच्याकडे २० सहस्र रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर १२ सहस्र रुपये द्यायचे ठरले. याविषयी तक्रारदार यांनी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. शरद ओंकार हे लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.

संपादकीय भूमिका 

लाच स्वीकारणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !