साधकांनी साधना करतांना उत्तरदायी साधकांना साधनेचा आढावा देण्याला पुष्कळ महत्त्व आहे. उत्तरदायी साधकांचे अनेक साधकांनी आढावा देण्याच्या संदर्भात लिहिलेले चिंतन वाचल्यानंतर लक्षात आले, ‘बहुतांश साधक साधनेचा आढावा देण्याच्या संदर्भात न्यून पडत आहेत. काही जणांनी आढावा देणे थांबवले आहे.
१. ‘आढावा देणे’ ही आत्मनिवेदन भक्ती आहे !
आढावा देणे, म्हणजे साधनेचे प्रयत्न जसे होत आहेत, तसे प्रांजळपणे संत किंवा उत्तरदायी साधक यांना नियमितपणे आत्मनिवेदन स्वरूपात सांगणे. ‘आढावा देणे’ ही आत्मनिवेदन भक्तीच आहे. आढावा देणे, म्हणजे केवळ चांगले प्रयत्न सांगणे, असे नव्हे; तर ‘आपण कुठे न्यून पडत आहोत ?’, त्याविषयीही प्रांजळपणे सांगणे. आढावा देणे, म्हणजे स्वतःला पूर्णपणे रिक्त करणे होय.
‘साधनेचा आढावा’ हे साधकांच्या साधनारूपी रोपट्याचे एक प्रकारे कुंपणच असते. या कुंपणातच साधकांचे साधनारूपी रोपटे सुरक्षित राहू शकते. रोपट्याचे रूपांतर वृक्षात होईपर्यंत साधकांनी साधनेचा आढावा देण्याची नितांत आवश्यकता असते. कुंपण नसेल, तर ते रोपटे कोमेजू शकते.
२. व्यष्टी साधनेचा आढावा प्रांजळपणे दिल्याने होणारे लाभ
अ. साधकांमध्ये व्यष्टी साधनेचे गांभीर्य टिकून रहाते.
आ. आरंभीच्या टप्प्यात साधकांनी प्रांजळपणे आणि नियमितपणे आढावा दिल्यास त्यांच्या व्यष्टी साधनेत सातत्य येते.
इ. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात साधकांना संत किंवा उत्तरदायी साधक यांच्याकडून साधनेच्या संदर्भात योग्य दृष्टीकोन मिळतात. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत ‘साधनेविषयी योग्य दृष्टीकोन काय ठेवायला हवा ?’, याचे दिशादर्शन साधकांना आढाव्यात होते.
ई. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे साधकांच्या मनातील अयोग्य विचारांना योग्य दिशा मिळते. त्यामुळे साधकांच्या मनातील शंका, द्वंद्व, तसेच त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेतील अडचणी दूर होतात; परिणामी साधकांचा उत्साह वाढून त्यांच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न परिणामकारक होतात आणि त्यांच्या साधनेची फलनिष्पत्ती वाढते. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रयत्न योग्य होण्याच्या दृष्टीकोनातून साधकांना ऊर्जा मिळते.
उ. साधकांच्या मनावरील ताण न्यून होतो.
ऊ. साधकांनी आढावा दिल्याने व्यष्टी साधनेचा आढावा देणाऱ्या अन्य साधकांनाही शिकायला मिळते, तसेच प्रेरणा मिळते.
ए. आढावा नियमितपणे दिल्यास देवाचे साहाय्य आणि आशीर्वादही मिळतात.
३. साधकांनी व्यष्टी साधनेचा आढावा न दिल्यास त्यांची होणारी हानी
३ अ. योग्य दिशा न मिळणे : साधकांनी आढावा न दिल्यास त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा न मिळाल्याने त्यांचे प्रयत्न अल्प होतात, तसेच ‘आपल्याकडून जे प्रयत्न होतात, ते योग्यच आहेत’, असे त्यांना वाटू लागते आणि त्यांच्या साधनेत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात; परिणामी त्यांचे साधनेचे प्रयत्न अल्प होतात.
३ आ. अल्पसंतुष्टता निर्माण होणे : साधकांनी आढावा न दिल्यास त्यांचे जे प्रयत्न होत आहेत, त्यातच ते समाधानी रहातात आणि त्यांच्यात अल्पसंतुष्टता निर्माण होते.
३ इ. साधकांनी आढावा न दिल्यास ते देवाचे साहाय्य मिळण्यापासून वंचित रहातात आणि त्यांच्या साधनेची फलनिष्पत्ती न्यून होते.
४. व्यष्टी साधनेचा आढावा न देण्यामागील कारणे
४ अ. साधकांमधील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू : साधकांनी व्यष्टी साधनेचा आढावा न देण्यामागे त्यांच्यातील ‘गांभीर्य नसणे, नियोजनाचा अभाव, चालढकलपणा, सवलत घेणे, आळस, दुर्लक्ष करणे, स्वतःच्या मनाप्रमाणे करणे, आढावा देण्याला महत्त्व न देणे, प्रतिमा जपणे’ आदी स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू बहुधा कारणीभूत असतात.
४ आ. व्यवहार आणि साधना यांची योग्य सांगड न घालणे : साधकांनी त्यांच्या दिवसभरातील वेळेचे योग्य नियोजन न केल्याने त्यांच्याकडून समोर येणाऱ्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. साधकांना व्यवहार आणि साधना यांची योग्य सांगड घालता न आल्याने त्यांच्याकडून व्यष्टी अन् समष्टी साधना, तसेच सेवा यांचा आढावा देणे राहून जाते.
त्या दृष्टीने व्यवहार आणि साधना यांसाठी वेळेचे योग्य नियोजन केले आणि प्राधान्य ठरवले, तर योग्य गोष्टींना न्याय दिला जाईल.
४ इ. सातत्य आणि चिकाटी नसणे : मनाला सतत सवलत घेण्याची सवय असल्यास व्यष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि चिकाटीने होत नाहीत; परिणामी आढावा देण्याकडे दुर्लक्ष होते. साधनेच्या दृष्टीने साधकांत ‘सातत्य आणि चिकाटी’ हे गुण आवश्यक आहेत. साधकांनी ते गुण स्वतःत आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
४ ई. कार्याला प्राधान्य देणे : एखादा उपक्रम असल्यास अथवा समष्टीसाठीचे मोठे नियोजन असल्यास साधकांनी व्यष्टी साधना आणि सेवा यांचे योग्य नियोजन न केल्यास त्यांच्याकडून कार्याला प्राधान्य दिले जाऊन त्यांचे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होते; परिणामी त्यांच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न न झाल्याने त्यांची आढावा देणे टाळण्याची मानसिकता होते.
४ उ. पुढाकार न घेणे : साधक साधना होण्यासाठी सर्व प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा उत्तरदायी साधकच स्वतःहून साधकांचा आढावा घेत असतात. खरेतर साधकांनीच स्वतःहून आढावा देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
४ ऊ. मनाची नकारात्मक स्थिती : साधकांच्या जीवनात एखादा मनाविरुद्ध प्रसंग घडल्यास त्यांच्या मनाची नकारात्मक स्थिती निर्माण होऊन त्यांच्याकडून आढावा देणे टाळले जाते. साधकांनी लक्षात घ्यावे, ‘त्यांच्या मनात आलेले नकारात्मक विचार त्यांचे नसून वाईट शक्तींनी त्यांना साधनेपासून दूर नेण्यासाठी त्यांच्या मनात घातलेले विचार आहेत. त्या नकारात्मक विचारांशी संघर्ष करून योग्य विचारांनी त्यांवर मात करून आढावा दिल्यास नकारात्मक स्थितीतून बाहेर पडू शकतो.’
४ ए. स्वतःला मर्यादा घालणे : आपले व्यावहारिक कर्तव्य, तसेच आपल्याकडून होणारे साधनेसाठीचे प्रयत्न, या संदर्भात ‘मला एवढेच शक्य आहे’, असा विचार करून साधकांकडून स्वतःला मर्यादा घातल्या जातात आणि आढावा देणे टाळले जाते.
४ ऐ. कार्य साधना म्हणून न होणे : बऱ्याच वेळा कार्य साधना म्हणून होत नाही. ‘कार्य हे आपल्या साधनेसाठी आहे’, याची जाणीव अल्प असल्याने साधकांचे आढावा देण्याकडे दुर्लक्ष होते.
४ ओ. व्यष्टी साधनेच्या संदर्भात अयोग्य दृष्टीकोन असणे : कधी कधी साधकांकडून ‘उत्तरदायी साधक व्यस्त असतात. त्यामुळे आढावा द्यायला नको’, असा नकारात्मक विचार केला जातो. काही साधकांनी ‘आपण व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले करू आणि नंतर आढावा देऊ’, असा विचार करण्याऐवजी ‘व्यष्टी साधना चांगली होण्यासाठीच आढावा देणे आवश्यक आहे’, असा विचार करायला हवा.
४ औ. प्रतिमा जपणे : साधकांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाल्यास ‘उत्तरदायी साधक काय म्हणतील ?’, या प्रतिमेच्या विचारांमुळे त्यांच्याकडून आढावा देणे टाळले जाते. अनेक वेळा साधकांकडून कार्य किंवा व्यष्टी साधना यांसंदर्भात चांगले प्रयत्न झाल्यास आढावा दिला जातो; परंतु प्रयत्न अल्प झाल्यास आढावा देणे टाळले जाते.
४ अं. पाट्याटाकूपणे आढावा देणे : काही साधक त्यांचे संख्यात्मक प्रयत्न सांगतात; पण त्यांना गुणात्मक प्रयत्नांविषयी सांगता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयत्न पाट्याटाकूपणासारखे वाटतात. त्यांच्याकडून आढावा देणे टाळले जाते. साधकांनी गुणात्मकदृष्ट्या केलेले प्रयत्न आढाव्यात सांगायला हवेत.
४ क. आढाव्यात सांगितल्याप्रमाणे कृती न होणे : साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाल्यास उत्तरदायी साधक किंवा संत यांनी सांगितलेली सूत्रे साधक ऐकतात; परंतु साधकांकडून त्याप्रमाणे कृती होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आढावा देण्यास टाळाटाळ होते. साधकांनी संतांचे आज्ञापालन केल्यास त्यांना आध्यात्मिकदृष्ट्याही लाभ होतो.
४ ख. साधकांमध्ये स्वतःला पालटण्याची तळमळ नसल्यास त्यांच्याकडून प्रांजळपणे आढावा दिला जात नाही
४ ग. आढाव्याविषयी कृतज्ञताभाव अल्प असणे : आढाव्याच्या माध्यमातून उत्तरदायी साधक किंवा संत यांच्याद्वारे श्री गुरुच साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांना योग्य दिशा देत असतात. ‘साधक कुठे अल्प पडतो आणि त्यावर काय उपाययोजना करायला हवी ?’, याविषयी ते सुचवतात अन् ते उपाय करण्यासाठी शक्तीही देतात; म्हणून आढाव्याविषयी साधकांमध्ये कृतज्ञताभाव असायला हवा.
५. आढावा देतांना मनाची स्थिती कशी असावी ?
अ. साधकांमध्ये जिज्ञासा हवी. उत्तरदायी साधक एखाद्या प्रसंगात जी उपाययोजना सांगतात, ती लक्षपूर्वक जाणून आणि लिहून घेऊन साधकांनी त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करावा.
आ. साधकांनी आढाव्यात स्वतःत झालेल्या पालटांविषयी अभ्यासपूर्ण सूत्रे सांगावीत. साधकांनी स्वतःत झालेल्या पालटांचा अभ्यास केल्यास त्यांना आढावा द्यायला स्फूर्ती मिळते.
इ. परिपूर्ण साधना होण्यासाठी ‘आढाव्यात सांगायच्या सूत्रांचे चिंतन करण्यात मी कुठे न्यून पडलो ?’, असा साधकांचा विचार नेहमी असायला हवा.
ई. स्वतःचा आढावा घेतांना ‘कोणत्या सूत्रांचा आढावा घ्यायचा आहे ?’, त्याकडे साधकांचे सतत लक्ष असायला हवे.
उ. आढावा देतांना ‘ईश्वर आपल्याला साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करत आहे’, असा कृतज्ञताभाव साधकांमध्ये असणे आवश्यक आहे.
६. आढावा नियमित देण्याच्या दृष्टीने करायची उपाययोजना
६ अ. आढावा देण्याचे महत्त्व मनावर बिंबवणे : साधकांनी व्यष्टी साधना करण्याचे आणि आढावा देण्याचे महत्त्व मनावर सातत्याने बिंबवायला हवे. त्यासाठी त्यांनी स्वयंसूचना द्याव्या.
६ आ. प्रायश्चित्त पद्धतीचा अवलंब करणे : साधकांनी प्रसंगी शिक्षापद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे त्यांच्यात आढावा देण्याचे गांभीर्य टिकून रहाते आणि ‘आढावा द्यायलाच हवा’, याची मनाला जाणीव होते. स्वतःकडून व्यष्टी साधनेचा आढावा नियमितपणे दिला जात नसल्यास साधकांनी प्रायश्चित्त घ्यावे.
६ इ. इतरांचे साहाय्य घेणे : साधकांनी ‘नेमकेपणाने आढावा कसा द्यायला हवा ? योग्य आढावा देण्याच्या दृष्टीने कुठे न्यून पडत आहोत ?’, या संदर्भात इतरांचे साहाय्य घ्यायला हवे.
६ ई. साधकांनी ‘गुरुमाऊलीला आढावा देत आहोत’, या भावाने आढावा द्यावा.
‘व्यष्टी साधनेचा नियमितपणे, अभ्यासपूर्वक, तसेच मनापासून आढावा देण्याची; तसेच आढाव्यात केल्या जाणाऱ्या दिशादर्शनाप्रमाणे कृती करून अध्यात्मात पुढे जाण्याची प्रेरणा साधकांना होवो’, अशी मी प्रार्थना करतो.
(साधनेसाठी मार्गदर्शक असलेला हा लेख साधकांनी संग्रहासाठी ठेवावा.)
– (सद्गुरु) श्री. सत्यवान कदम, सिंधुदुर्ग (७.६.२०२२)