कल्याण येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

कल्याण, १५ जून (वार्ता.) – कल्याण पूर्व येथे लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने रहात्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत एका मुलीच्या साहाय्याने ७ तरुण संबंधित तरुणीवर मागील दीड वर्षापासून लैंगिक अत्याचार करत होते. तरुणीच्या भ्रमणभाषमध्ये आढळलेल्या आत्महत्येच्या पत्राच्या (सुसाईड नोट) आधारे कल्याण येथील कोळशेवाडी पोलिसांनी सनी, विजय यादव, प्रमेय तिवारी, शिवम पांडे, कृष्णा जयस्वाल, आनंद दुबे, निखिल मिश्रा, काजल जयस्वाल या आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

तरुणींनो, आत्महत्या करण्यापेक्षा लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !