किरकीटवाडी (पुणे) – मागील वर्षभरापासून वीजदेयक थकल्याने महावितरणने खडकवासला येथील अंगणवाडीचे मीटर २ मासांपूर्वी काढून नेले. विजेअभावी येथील विद्युत् उपकरणे बंद आहेत. थकलेल्या वीजदेयकाचा भरणा जिल्हा परिषद करत नाही, तसेच शिक्षण विभाग पालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने पालिकाही याचे दायित्व घेत नाही.
अंगणवाडी सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहे; मात्र विजेअभावी उपकरणे बंद असणे हे व्यवस्थेचे दुर्दैव आहे. सरकारने यावर त्वरित तोडगा काढावा, असे मत अधिवक्ता अनुराधा मते यांनी व्यक्त केले.
महापालिकेचे आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत, असे मत खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते यांनी व्यक्त केले. शिक्षण विभाग अद्याप महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे हस्तांतरित झाला नाही त्यामुळे उत्तरदायित्व निश्चित झाले नाही, असे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकागावे महापालिकेत हस्तांतरण करतांना पूर्ण नियोजन करूनच नंतर करायला हवी. उतावळेपणाने केलेल्या कारभाराची ही फळे आहेत. मतांसाठी केलेला हा कारभार आहे, असे जनतेला वाटल्यास त्यामध्ये चूक काय ? |