‘पावसाळा हा आनंददायी ऋतू आहे; पण पावसाळा चालू होताच वातावरणात वेगाने पालट होतात. त्यामुळे मानव, प्राणी आणि वनस्पती यांची प्रचंड हानी होते. मानवी जीवन निर्धोक होण्यासाठी जशी काळजी घेतली जाते, तशी पशू-पक्षी यांच्याही जीवितरक्षणाची काळजी घेणे आवश्यक ठरते. वातावरणात वाढलेला गारवा, दूषित पाणी आणि कामाचा ताण यांमुळे पशूधनाची उत्पादनक्षमता खालावते अन् अधिक हानी होते.
पशू-पक्ष्यांचा गळका निवारा, चारा आणि खाद्य यांमधील पालट, जंत-गोचीड यांचा संसर्ग, कासेचे आजार, तसेच पिण्याच्या पाण्याची खालावलेली गुणवत्ता यांमुळे पशू-पक्ष्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. पशू-पक्ष्यांचे विविध वयोगट आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून वर्गीकृत गट यांनुसार होणाऱ्या आजारांची वर्गवारी येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/586792.html
३. कोंबडी आणि कबूतर यांचे आजार
कोंबडीपालन हा वेगाने वाढणारा उद्योग आहे. रोजगाराची निर्मिती, योग्य आर्थिक प्राप्ती, ग्रामीण आणि नागरी मानवी जीवनाच्या प्रथिनांची आवश्यकता भागवणे, तसेच पिके, फळे-फुलबागा यांसाठी लागणाऱ्या उत्कृष्ट खताचा पुरवठा करणे यांमध्ये या उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. पावसाळ्यात होणारी हवेतील आर्द्रतेची वाढ, वातावरणातील उष्णतेमध्ये झालेली घट, वाऱ्याचा वाढलेला वेग, खाद्यसेवनाचे अल्प झालेले प्रमाण इत्यादींमुळे अंड्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर ताण येतो आणि अंडी उत्पादनात घट होते. तसेच मृत्यूचा दर वाढतो.
३ अ. फॉवल पॉक्स (Fowl pox) : कोंबड्यांना हा आजार ‘Avipox’ या विषाणूमुळे होतो.
लक्षणे : तुरा आणि गलोल यांवर (गळ्याखालील पिसे नसलेल्या भागावर) फोड येतात. जीभ, टाळू आणि डोळ्याखाली पिवळसर चिकट पदार्थ साठतो. डोळे आणि नाक गळते, भूक मंदावते, वजन घटते आणि उत्पादनात घट होते. आजाराचा कालावधी २ ते ३ आठवडे दिसून येतो.
उपचार : पशूवैद्यकाच्या सल्ल्याने टेट्रासायक्लीन (Tetracycline) औषधे पाण्यातून द्यावीत. जंतूनाशक मलम लावावे. जीवनसत्त्वांचे औषध पाण्यातून द्यावे.
प्रतिबंध : वयाचे ६ आठवडे आणि ११ आठवडे यांमध्ये लसीकरण करावे.
३ आ. फॉवल चोलेरा (Fowl cholera) : हा आजार ‘Pasteurella multocida’ या जिवाणूपासून होतो.
लक्षणे : हिरवट पिवळसर संडास होणे, भूक मंदावणे आणि बंद होणे, श्वसनास त्रास होणे, तहान वाढणे, सांध्यांना सूज येणे, वजन अल्प होणे इत्यादी. या रोगामध्ये मृत्यूचा दर ९० टक्के असतो.
उपचार : पशूवैद्यकाच्या सल्ल्यानुसार सल्फा, पेनिसिलीन, टेट्रासायक्लीन या प्रतिजैविक औषधांचा वापर खाद्य किंवा पाणी यांतून करणे.
३ इ. Bacillary diarrhoea : हा आजार ‘Salmonella pullout’ या जिवाणूपासून होतो.
लक्षणे : पांढरे चिकट संडास होणे, भूक मंदावणे, श्वसनास त्रास होणे, अचानक मृत्यू होणे. यात मृत्यूचे प्रमाण ८० टक्के असते. पक्षी थंड पडतात.
उपचार : आजारी पक्ष्यांना वेगळे करावे. पाणी किंवा खाद्य यांतून सल्फा औषधे द्यावीत.
३ ई. Aspergillosis (Brooders pneumonia) : हा बुरशीजन्य आजार आहे.
लक्षणे : चोच उघडी रहाणे, श्वसनास त्रास होणे, श्वसन करतांना घरघर आवाज येणे, डोळे सुजलेले असणे, डोळ्याखाली चिकट पदार्थ साठणे, तहान वाढणे.
उपचार : या रोगावर कोणतेही प्रभावी उपचार नाहीत.
प्रतिबंध : बुरशी आलेल्या खाद्याचा वापर करणे टाळावे.
३ उ. Coccidisis : हा आजार Eimeria या एकपेशीय जंतूंमुळे होतो.
लक्षणे : रक्ती हगवण, तुरा सुकणे, भूक मंदावणे, पक्षी कृश होणे, अंडी उत्पादनात घट होणे.
उपचार : आजारी पक्षी वेगळे करणे, पशूवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर करणे, उदा. Bifurton गोळ्या, Amprolsol भुकटी, Vimeral द्रवरूप जीवनसत्त्व औषध इत्यादी.
३ ऊ. सर्वसाधारण उपाय
१. निवाऱ्यासाठी न गळणारे छप्पर, बाजूबंद आणि बसण्यासाठी कोरडी जागा असावी.
२. प्रत्येकी ३ मासांनी नियमित जंतनिर्मूलन करणे.
३. योग्य आणि पुरेसा दिव्यांचा प्रकाश हवा. दिवसाचा १६ घंटे प्रकाश असावा.
४. पुरेसे आणि योग्य गुणवत्तेचे खाद्य देणे
५. विमासंरक्षण ठेवणे
६. पक्ष्यांची गर्दी टाळणे. (प्रति चौरस मीटर ३ ते ५ पक्षी एकत्रित असावेत.)
७. नियमित लसीकरण करणे.
८. ‘ऑल इन ऑल आऊट’ पद्धती वापरणे, म्हणजे सर्व पक्ष्यांची खरेदी आणि विक्री एकाच वेळी केल्यास निवारा निर्जंतुक करण्यास साहाय्य होते.
९. पावसाचे पाणी आणि उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाश यांच्यापासून प्रतिबंध करण्यासाठी बाजूच्या भिंतीच्या बाहेर छप्पर असावे.
१०. शेडमध्ये (खुराड्यामध्ये) प्रवेश करण्यापूर्वी रोगप्रसार टाळण्याच्या हेतूने पाय किंवा पादत्राणे बुडवण्यासाठी निर्जंतुक द्रावण ठेवले जावे.
४. कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांमधील आजार
पावसाळ्यामध्ये कुत्रा आणि मांजर यांना घराबाहेर फिरण्यास मर्यादा येत असल्यामुळे पुरेसा व्यायाम, संतुलित आहार, आहारामध्ये दह्याचा वापर करणे हे कुत्रा आणि मांजर यांचे आरोग्य उत्तम रहाण्यासाठी हितावह असते. पावसाळ्यामध्ये पाणी दूषित झाल्यामुळे अन्नमार्ग सुरक्षित ठेवणे आवश्यक असते.
४ अ. गोचीड ताप (Tick fever)
लक्षणे : ताप येणे, सांध्यांना सूज येणे, कफ होणे, श्वसनास त्रास होणे, पोटदुखी, उलटी आणि अतिसार, तोंडावर सूज येणे इत्यादी.
उपचार : पशूवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली टेट्रासायक्लीन, डॉक्सीसायक्लीन, मोनोसायक्लीन या प्रतिजैविक औषधांचा वापर करावा.
प्रतिबंध : गोचिडांचा संसर्ग टाळणे, अंगावरील गोचीड नियमितपणे काढणे, वर्षभर गोचीड प्रतिबंधक औषधांचा पशूवैद्यकाच्या सल्ल्यानुसार वापर करणे इत्यादी.
४ आ. डायरिया (Diarrhoea) : अपचन आणि अतिसार यांमुळे कुत्रा अन् मांजर लवकर अशक्त होते. वेळेत उपचार न केल्यास पुढे मूत्रमार्गाचे विकार बळावतात आणि मृत्यूचे प्रमाण वाढते.
लक्षणे : उलटी आणि अतिसार शारीरिक वजनात घट होणे, भूक मंदावणे, पोटात वेदना होणे इत्यादी.
उपचार : तज्ञ पशूवैद्यकाकडून योग्य उपचार करून घ्यावेत. तसेच शरिरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तोंडावाटे अथवा शिरेद्वारे औषधे आणि सलाईन देणे आवश्यक असते.
भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/587993.html
– पशूवैद्यक बाबूराव कडूकर, पशूचिकित्सा विज्ञान आणि पशूसंवर्धन पदवीधर, डी.फार्म, एम्.बी.ए., निवृत्त पशूवैद्यकीय अधिकारी, गडहिंग्लज, कोल्हापूर (४.६.२०२२)