अवैध गर्भपात प्रकरणातील संशयित आरोपी परिचारिकेची आत्महत्या !

बीड, ८ जून (वार्ता.) – २ दिवसांपूर्वी अवैध गर्भपात करतांना महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ५ जणांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी सीमा सुरेश डोंगरे या परिचारिकेने ८ जून या दिवशी बिंदूसरा धरणात आत्महत्या केली. अवैध गर्भपात करतांना रक्तस्त्राव अधिक झाल्याने गंभीर अवस्थेत महिलेला एका खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र या वेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (मागील अनेक वर्षांपासून अवैध गर्भपात रोखू न शकणारे प्रशासन सुशासन काय आणणार ? – संपादक)

शवविच्छेदन अहवालात अवैध गर्भपात करतांना मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मृत महिलेचे पती आणि कुटुंबिय यांना कह्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर महिलेचे नाव सांगितले.