‘हिंदु धर्म’ हा हिंदुत्वाचा अविभाज्य भागच !

हिंदुत्व आणि हिंदु धर्म वेगळे आहे का ?

सध्या हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांविषयी अपसमज केले जात आहेत. ते दूर करणे नितांत आवश्यक आहे. ‘हिंदुत्व आणि हिंदु धर्म वेगळे आहेत का ? जर असे असेल, तर का ? आणि कसे ?’, यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केला आहे.

१. हिंदुत्वाविषयीचे गैरसमज

तुम्ही एखाद्या सामान्य हिंदुत्वनिष्ठाला विचारले की, हिंदुत्व आणि हिंदु धर्म म्हणजे काय ? तर तो म्हणेल, ‘दोन्ही एकच आहेत’ किंवा तो असे म्हणेल, ‘हिंदुत्व हे हिंदु धर्मासारखेच आहे, फक्त त्यास राजकारणाची जोड आहे.’ एका मार्क्सवादी इतिहास तज्ञाला किंवा नास्तिक आणि धर्मनिरपेक्ष व्यक्तीला विचारले, तर तो म्हणेल, ‘हिंदुत्व म्हणजे उच्चवर्णीय, काही प्रमाणात मध्यमवर्गीय हिंदूंची फॅसिस्ट (अनुयायी) राजकीय वर्चस्ववादी, पितृसत्ताक, दुराचारवादी आणि जातीयवादी शक्ती आहे.’ त्यातही हिंदुत्वाला आतंकवादाशी जोडणे, हे त्यांच्या विचारशील वृत्तीतील असलेली कमतरताच दर्शवते. तरीही कथित विचारवंतांच्या पोळ्या अजून भाजल्या जाऊ नयेत, म्हणून हिंदुत्व आणि हिंदु धर्म यांचा संबंध जाणून घेऊया.

२. हिंदुत्व हा इतिहास आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात लिहितात, ‘हिंदु धर्म’ हा शब्द फक्त ‘हिंदुत्व’ यापासून उत्पन्न झालेला अंशात्मक नि एक देश दाखवणारा शब्द आहे. ‘हिंदुत्व’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट केल्यावाचून ‘हिंदु धर्म’ याचा अर्थ अनिश्चित रहातो.’

३. ऐतिहासिक एकत्वाचे राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व !

या इतिहासाचा मागोवा घेतांना विचारार्ह गोष्ट ही की, अशी कोणती गोष्ट आहे की, जी हिंदूंना एकत्वाने, एक राष्ट्रीयत्वाने बांधून ठेवत आली आहे ? हिंदु संस्कृती आणि धर्म यांमधील हा हिंदूपणा नक्की आहे तरी काय ? अशा प्रश्नांच्या उत्तराच्या शोधार्थ सावरकर होते. त्या ऐतिहासिक एकत्वाच्या राष्ट्रीयत्वाला त्यांनी नाव दिले ‘हिंदुत्व !’
सावरकर म्हणतात, ‘‘हिंदुत्व’ याचा अर्थ काही ‘हिंदु धर्म’ या शब्दार्थाशी पुष्कळ लोक समजतात, तसा समान नाही. ‘धर्म’ या शब्दाने सामान्यतः कोणत्या तरी आध्यात्मिक वा धार्मिक पंथांच्या वा मताच्या नियमांचा अथवा सिद्धांताचा संग्रह असा अर्थ घेतला जातो. भाषेच्या पद्धती जर आमच्या वाटेत आल्या नसत्या, तर ‘हिंदूपणा’ हाच शब्द हिंदुत्वाशी अधिक जवळ म्हणून आम्ही योजिला असता.’’

४. ‘हिंदुइझम’ म्हणजे सर्व हिंदू जाती !

साहजिकरित्या ‘हिंदुइझम’ (हिंदु धर्म) याचा अर्थ ‘या भूमीमध्ये रहाणाऱ्या लोकांचा नैसर्गिक धर्म’ असा असला पाहिजे. ‘हिंदुइझम’ ही एक धर्मपद्धत आहे; परंतु परस्पर प्रतिकूल इतकेच काय परस्परविरोधी अशा पद्धतींचा समूह एक कसा असू शकेल ? असा प्रश्न येतो. मग हिंदु लोक असे एकत्वाने रहातच नाहीत आणि हे एक राष्ट्र नाही; उलट वेगवेगळ्या धर्ममताने विभागलेले आहे, असा निष्कर्ष काढला जातो.

सावरकर म्हणतात, ‘‘हिंदुत्व’ नि ‘हिंदुइझम’ हे दोन्ही शब्द ‘हिंदु’ या शब्दापासून उत्पन्न झालेले असल्यामुळे त्यांचा अर्थ ‘सर्व हिंदु जाती’ असाच घेतला पाहिजे. ‘हिंदुइझम’च्या ज्या व्याख्येच्या योगाने हिंदु जातीचा कोणताही महत्त्वाचा भाग बाहेर राहील किंवा त्याला आपल्या समजूती लपवून ठेवणे भाग पडेल, ती व्याख्या अर्थात्च निरुपयोगी ठरेल. ‘हिंदुइझम’ याचा अर्थ म्हणजे हिंदु लोकांमध्ये सर्वसाधारण ज्या धार्मिक समजूती आढळतात, त्यांना एकीकृत करणारी पद्धत आणि हिंदूंच्या या धार्मिक समजूती शोधून काढण्याचा म्हणजे ‘हिंदुइझम’ काय आहे, हे जाणण्याचा एकच मार्ग म्हटला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपल्याला ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या केली पाहिजे; परंतु धार्मिक भिन्नता असूनही जैन, वैदिक, सनातनी बौद्ध धर्मपंथविरोधी मते असूनही एकत्वाने नांदत आहेत, त्यांच्यात त्यांचे हिंदूपण आहेच ! यांच्यातील हे बंधुत्व, एकत्व, हिंदूपण किंवा ‘हिंदुत्व’ नक्की कशामुळे अबाधित आहे ? या प्रश्नांची उत्तरे याच इतिहासात आहेत. ती एकत्वाची, हिंदुत्वाची कारणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शोधून काढली.

५. सावरकर यांनी ‘धर्मांतरित झालेल्या हिंदूंसाठी भारत ‘पितृभू’ आणि अरबस्तान अथवा पॅलेस्टाईन ही त्यांची ‘पुण्यभू’ आहे’, असे स्पष्टपणे सांगणे

सावरकर याविषयी स्पष्ट सांगतात, ‘‘प्रथम बलात्काराने हिंदूंचे मुसलमान अथवा ख्रिस्ती केले गेले आणि म्हणूनच ज्यांचा हा देश म्हणजे ‘पितृभू’ झालेला आहे नि भाषा, लौकिक समजूती आणि इतिहास या सर्व संस्कृतीचे काही अंशांनी जे भागीदार झाले आहेत, ते ‘पुण्यभू’च्या लक्षण मीमांसेने हिंदू मात्र होऊ शकत नाहीत. त्यांची ‘पुण्यभू’ फार दूर असलेल्या अरबस्तान अथवा पॅलेस्टाईन येथे आहे. आम्ही त्यासंबंधात त्यांचा निषेधही करत नाही किंवा त्याविषयी अश्रूही गाळत बसत नाही. आम्ही केवळ ज्या गोष्टी जशा आहेत, तशा सांगत आहोत.’’

६. ‘हिंदुत्व’ हा ‘हिंदु’ शब्दाचा आत्मा !

‘हिंदु धर्म’ हा हिंदुत्वाचा अविभाज्य भाग आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदूपण आहे, कोणतीही आतंकवादी किंवा राजकीय विचारधारा नाही. ‘हिंदुत्व’ हा ‘हिंदु’ शब्दाचा आत्मा आहे.

– कवितके आदित्य अजित

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)