पणजी – गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ (मर्दन करण्याचे ठिकाण) अवैध असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार गोव्यात कार्यरत असलेले ‘मसाज पार्लर’ची सरकार दरबारी नोंदणी करतांना वेगळ्या नावाने करण्यात आली आहे. अधिकृत मसाज पार्लर चालू करायचे असल्यास त्या ठिकाणी आयुर्वेदाचे वैद्य नियुक्त करावे लागतात, तसेच ग्राहकाला मोकळ्या ठिकाणी हवेशीर जागेत मालीश करावी, अशी अट असते. त्यामुळे ‘मसाज पार्लर’ या नावाने अनुज्ञप्ती न घेता ‘स्पा’ (विशिष्ट प्रकारचे मर्दन करण्याचे ठिकाण) या नावाने अनुज्ञप्ती घेतली जाते.
Goa CM Pramod Sawant asks police to take action against illegal massage parlours#PramodSawant #GoaCM https://t.co/gZ5EWX5qgn
— Mid Day (@mid_day) June 6, 2022
ज्या ठिकाणी मर्दन करणार, ती पूर्णतः बंद करता येत नाही किंवा खोलीला आतून कडी घालता येत नाही; मात्र सध्या चालू असलेल्या ‘स्पा’मध्ये बंद खोलीत मालीश केली जाते. तेथे आयुर्वेदाचे वैद्यही नियुक्त केलेले नसतात. त्यामुळे अशा ठिकाणी गैरकृत्ये घडतात. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘स्पा’ आहेत. गोव्यातील काही शहरांमध्ये ‘हेअर कटिंग सलून’ वजा ‘स्पा’ (केशकर्तनालय आणि मर्दन करण्याचे असे एकत्रित ठिकाण) अशी नोंदणी करण्यात आली आहे. या ‘मसाज पार्लर’मधील बहुतांश परप्रांतीय तरुणी कर्मचारी म्हणून कार्यरत असतात. त्यात नेपाळमधील तरुणींचे प्रमाण अधिक आहे. तेथे जाणारे ग्राहक गोव्याबाहेरून येणारे पर्यटक असतात. गोव्यात मौजमजा करण्यास आल्यावर या ‘पार्लर’चे आकर्षण त्यांना असते. पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणी त्यांना भुरळ पाडून स्वतःच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडून अवास्तव दराने पैसे घेतात. हे ‘मसाज पार्लर’ किंवा ‘स्पा’ यांची पोलिसांनी पडताळणी करण्याची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकाहे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध ‘मसाज पार्लर’ चालू कसे झाले ? अवैध कृत्यांना पाठिंबा देणाऱ्यांवरही कारवाई होणे आवश्यक ! |