‘स्वतःचे प्रश्‍न हे सर्व जगाचे प्रश्‍न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी !  

  • परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी युरोपला फटकारले

  • चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती

ब्रातिस्लावा (स्लोव्हाकिया) – ‘स्वतःचे प्रश्‍न हे सर्व जगाचे प्रश्‍न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी; कारण जगाचे प्रश्‍न हे युरोपचे प्रश्‍न नाहीत, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी युरोपला फटकारले. ते युरोपमधील स्लोव्हाकिया देशाची राजधानी ब्रातिस्लावा येथे आयोजित ‘ग्लोबसेक २०२२’ परिषदेत बोलत होते.

१. जयशंकर चीनविषयी म्हणाले की, चीनशी भारताचे संबंध ताणलेले आहेत; परंतु भारत त्याचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. जर भारताला जागतिक समर्थन मिळाले, तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल; पण ‘मी एका संघर्षांत उतरावे; कारण मला त्यातून अन्य संघर्षांत साहाय्य होईल’, या समजुतीवर जग चालत नाही, असेही त्यांनी युरोपला सुनावले.

२. जयशंकर पुढे म्हणाले की, युक्रेनवरील आक्रमणावरून भारताने रशियावर टीका करावी, अशी युरोपातील काही देशांची अपेक्षा आहे. ‘भारताला चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी जगाच्या साहाय्याची आवश्यकता भासू शकते’, असा त्या देशांचा तर्क आहे; परंतु भारताचे चीनशी संबधित अनेक प्रश्‍न आहेत; परंतु त्याचा युक्रेन किंवा रशिया यांच्याशी काडीचाही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.