ज्ञानवापी मशिदीविषयी केलेले विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मागे घ्यावे !

भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांची मागणी

श्रीराममंदिराच्या निर्मितीत सरसंघचालक आणि रा.स्व. संघ यांचे योगदान नसल्याचाही दावा

उजवीकडे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नवी देहली – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी  विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी मुसलमान आक्रमणकर्त्यांच्या बाजूने आहेत, त्याप्रमाणेच सरसंघचालकही त्यांच्या बाजूने आहेत का ?, असा प्रश्‍न अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी उपस्थित केला. सरसंघचालकांनी ‘श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनानंतर संघ कोणत्याही आंदोलनात उतरलेला नाही. आता ज्ञानवापीचे सूत्र समोर आले आहे. ज्ञानवापीविषयी आमची श्रद्धा परंपरेतून चालत आली आहे; मात्र आता प्रत्येक मशिदीत शिवलिंग का पहावे ?’, असा प्रश्‍न नुकताच उपस्थित केला होता. या प्रकरणी चक्रपाणी महाराज बोलत होते. ‘श्रीराममंदिराच्या निर्मितीत सरसंघचालक आणि रा.स्व. संघ यांचे कोणतेही योगदान नाही’, असेही चक्रपाणी महाराज यांनी सांगितले.