जिल्हा आणि रेल्वे प्रशासन यांची कारवाई !
ठाणे, २९ मे (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, कोपर आणि कोनखाडी परिसरातून अवैधरित्या वाळू उपसा करणार्यांविरोधात जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईमध्ये वाळू माफियांचे सुमारे ३० ते ५० लाख रुपयांचे वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट करण्यात आले. तेथे उपसा करून ठेवण्यात आलेली १० ब्रास वाळूत मातीमिश्रित करून तिची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मागील काही मासांपासून वाळूमाफियांकडून नदी आणि खाडीतून जाणार्या रेल्वे पुलांच्या तळाशी वाळू उपसा चालू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाणे महसूल विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि रेल्वे प्रशासन यांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई केली.