रेल्वेस्थानकांच्या विद्रूपीकरणाला शिक्षितवर्ग कारणीभूत
मुंबई, २९ मे (वार्ता.) – दादर हे मोठे ‘जंक्शन’ (अनेक गाड्या एकत्र येण्याचे ठिकाण) असल्यामुळे मुंबईमध्ये येणार्या लांब पल्ल्याच्या बहुतांश रेल्वेगाड्या दादर रेल्वेस्थानकात थांबतात. या वेळी लांब पल्ल्यांच्या गाड्यांतील प्रवासी रेल्वेच्या प्रत्येक डब्यात कचरापेटी असतांनाही रिकाम्या पाण्याच्या बाटल्या रेल्वेरुळांवरच फेकून देतात. यामध्ये शिक्षितवर्गाचा समावेश अधिक असतो. प्रवाशांनी फेकलेल्या शेकडो बाटल्यांचा प्रतिदिन खच पडलेला दिसून येतो. यामुळे रेल्वेस्थानकांचे विद्रूपीकरण होत आहे.
१. रेल्वेच्या डब्यांतील कचर्याच्या पेटीत रिकाम्या बाटल्या टाकणार्या प्रवाशांची संख्या अत्यल्प असते. बहुतांश प्रवासी बाटल्या रेल्वेच्या डब्यात इतरत्र टाकतात किंवा रेल्वेरुळांवर फेकून देतात.
२. गाडी थांबल्यावर भंगारवाले प्रत्येक डब्यात जाऊन इतरत्र टाकलेल्या, तसेच कचरापेटीतील बाटल्या गोळा करतात. रेल्वेरूळांवर टाकलेल्या बाटल्याही गोळा करतात. रेल्वेरुळांवर टाकण्यात येणार्या बाटल्या गोळा करणार्या भंगारवाल्यांना रेल्वेचे सुरक्षारक्षक हटकतात; परंतु ते त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे सुरक्षारक्षकांचे लक्ष चुकवून ते बाटल्या गोळा करतात.
३. रेल्वेरुळांवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांसह, प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, चहाचे कप, तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. रेल्वेतील बहुतांश प्रवासी अशा प्रकारे रेल्वेतून कचरा बाहेर फेकतात.
४. याविषयी दादर रेल्वेस्थानकांवरील पाण्याच्या बाटल्या गोळा करणार्या महिलांना दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारले असता त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही रेल्वेमधील आणि रेल्वेरुळांवरील पाण्याच्या बाटल्या नियमित गोळा करतो. नंतर नालासोपारा येथील एका आस्थापनात बाटल्या विकतो.’’
जनप्रबोधनाची आवश्यकता !काही वर्षांपूर्वी रेल्वेच्या डब्यांतील शौचालयांच्या कमोडमध्येही कचरा आणि पाण्याच्या बाटल्या टाकण्याचे प्रकार व्हायचे. रेल्वेप्रशासनाकडून शौचालयात याविषयी लावलेल्या सूचना आणि प्रबोधन यांमुळे यामध्ये चांगल्या प्रकारे पालट झाला आहे; मात्र रेल्वेमार्गवर टाकण्यात येणार्या कचर्याची समस्या अद्यापही तशीच आहे. याविषयी रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. |
संपादकीय भूमिका
|