गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी ५ विद्यार्थ्यांना निलंबित करणार ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

पणजी, २८ मे (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणी ५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबित करणार आहे. याविषयी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांना सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘या प्रकरणी मुलांच्या वसतीगृहाचे ‘वॉर्डन’ (व्यवस्थापन पहाणारे) यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचा आणि प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे.’’ डॉ. बांदेकर म्हणाले, ‘‘महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांकडे वसतीगृहाच्या रक्षकाला अमली पदार्थ सापडले. हे विद्यार्थी ३ दिवसांपूर्वी वसतीगृहात मद्यपान करून आले होते. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा सापडला. याविषयी पोलिसांना माहिती देण्यात आली. प्रारंभी आगशी पोलीस या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास नकार देत होते; मात्र आरोग्य खात्याच्या सचिवांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.’’