छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदारकीची निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले. यापूर्वी छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या पाठबळाने राज्यसभेत गेले आहेत. या वेळी त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती; मात्र शिवसेनेने घातलेली पक्षप्रवेशाची अट मान्य नसल्यामुळे शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नाही. छत्रपती संभाजीराजे यांना आतापर्यंत विविध पक्षांकडून उमेदवारी देण्यात आली असली, तरी ते छत्रपती शिवरायांचे वंशज असल्यामुळे त्यांची उमेदवारी पक्षातीत आहे. ‘त्यांनी उमेदवारी कुणाकडे मागावी कि नाही ?’ हा चर्चेचा विषय होऊ शकतो; मात्र सध्या पक्षांतर हा संधीसाधूपणाचा विषय झाला आहे. निवडणुका आल्या की, अनेक नेते त्यांच्या सोयीनुसार राजकीय पक्षात प्रवेश करतात आणि संबंधित पक्षही राजकीय सोयीनुसार त्यांना प्रवेश देतात. मागील काही वर्षांतील पक्षांतराच्या घटना पहाता यामध्ये पक्षनिष्ठेचे सूत्र खुंटीवर टांगण्यात आल्याचे चित्र आहे. ही स्थिती निकोप लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
वर्ष १९८५ मध्ये पक्षांतराच्या घटना पहाता तत्कालीन केंद्र सरकारने पक्षांतरबंदी कायदा केला. या कायद्याच्या अंतर्गत एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्या उमेदवाराला अन्य पक्षात प्रवेश करता येत नाही. प्रवेश केलाच, तर त्याचे पद रहित होते. एखाद्या पक्षातील दोन-तृतीयांश उमेदवारांनी एकत्रित अन्य पक्षात प्रवेश केला, तर मात्र त्या उमेदवारांची उमेदवारी रहित होत नाही. सध्या मात्र निवडणुकीपूर्वीच उमेदवार अन्य पक्षात प्रवेश करतात आणि उमेदवारी प्राप्त करतात. हे पक्षांतर बंदी कायदाच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा असूनही त्याचा प्रभावी वापर होत नाही. हा विषय केवळ एखाद्या उमेदवारीचा नाही, तर पक्षनिष्ठेविषयी पक्षचिन्ह निर्माण करणारा झाला आहे. असे असले, तरी कोणताच राजकीय पक्ष याकडे गांभीर्याने पहात नाही, हेही तितकेच खरे.
सर्वच पक्षात समान चित्र !
सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या सर्वच प्रमुख पक्षांतील आघाडीच्या नेत्यांनी पक्षांतर केल्याचे दिसून येते. जसे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहिला, तर छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, एकनाथ खडसे हे पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. भाजपमधील हर्षवधन पाटील, विखे पाटील, नारायण राणे, प्रवीण दरेकर, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय निरूपम आणि शिवसेनेतील अब्दुल सत्तार, उदय सामंत, भास्कर जाधव आदी अनेक नावे सांगता येतील. पक्षांतर करण्यामागे ‘अनेक वर्षे पक्षात असूनही उमेदवारी दिली जात नाही’, ‘पक्षाकडून डावलले जाणे’, अशी कारणे दिली जातात. अनेकदा पक्षकार्यात सहभागी नसलेल्या; मात्र पैसे मोजण्याची सिद्धता असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. त्यामुळे पक्षांतर्गत अन्याय झाल्याचे घोषित करून अनेक नेतेमंडळी ज्या पक्षात उमेदवारी मिळेल, त्या पक्षात प्रवेश करतात. राजकीय पक्षांना एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जनाधार असलेल्या नेत्यांची आवश्यकताही असते. त्यामुळे सद्य:स्थितीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये विविध विचारसरणींची सरमिसळ झालेली पहायला मिळत आहे. याचा परिणाम राजकीय अस्थिरतेमध्ये होत असल्याचे पहायला मिळते.
नेत्यांमधील वैचारिक गोंधळ !
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाषण करतांना शिवसेनेचे नेते, तसेच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांना निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न सांगता येणार नाहीत’, असे वक्तव्य व्यासपिठावरून केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली. उदय सामंत हे नकळत बोलून गेले; मात्र पक्षांतर केलेल्या उमेदवाराला पाडण्यासाठी अशा किती तरी कृती होतांना दिसतात. काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील. एकाच पक्षात अनेक वर्षे असलेले, त्या विचारांचा प्रभाव असलेले नेते वेगळ्या पक्षात जाऊन त्या पक्षाच्या विचारसरणीनुसार वागू लागतात. यातून सर्वच पक्षांतर्गत वैचारिक गोंधळ निर्माण झाल्याचे पहायला मिळते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने भाजप-शिवसेनेत प्रवेश करणे किंवा शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांमध्ये प्रवेश करणे, ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. सध्या महाराष्ट्रात तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार स्थापन आहे. भाजपने अनेक राज्यांत स्थानिक विरोधी विचारांच्या पक्षांशी युती करून सत्ता स्थापन केली आहे. अशा वेळी सत्ता टिकवण्यासाठी विरोधी विचारांच्या पक्षांशी जुळवून घेण्यावाचून पर्याय नसतो; मात्र यामुळे सक्षम निर्णय घेण्यास मर्यादा येतात. आपण पहातो की, राजकारण हे नेहमीच सत्ताकेंद्रित असते. त्यामुळे सत्तेसाठी होणारी कपट-कूटनीती, कुरघोडी या गोष्टी इतिहासकाळापासून चालत आल्या आहेत; परंतु इतिहासकालीन काळात ‘कोण कोणत्या गटाचा आहे ?’, हे तरी कळत होते. सध्या मात्र सर्वच राजकीय पक्षांत विविध विचारांच्या नेत्यांची सरमिसळ झालेली पहायला मिळते. हे नेते पक्षाच्या तत्त्वाने बांधील नसतात, ते सत्ता आणि पद यांसाठी एकवटलेले असतात. सर्वच पक्षांत चालू असलेली ही पक्षांतरे हे त्याचेच लक्षण आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता ‘जनतेच्या भल्यासाठी काम करणारे नेते सध्या किती आहेत ?’ हा अभ्यासाचा विषय ठरेल.
पदासाठी पक्षाचा त्याग करणारे नेते ‘जनतेला दिलेली आश्वासने पाळतील’, याची शाश्वती कोण देणार ? |