(म्हणे) ‘वाराणसीमधील मंदिर जेवढे जुने तेवढीच ज्ञानवापी मशीदही जुनी !’

मुसलमानधार्जिणे शरद पवार यांच्याकडून ज्ञानवापी मशिदीचे समर्थन !

जाहीर सभेमध्ये शरद पवार यांच्याकडून ज्ञानवापी मशिदीचे समर्थन

मुंबई – वाराणसीमधील मंदिर जेवढे जुने आहे, तेवढीच ज्ञानवापी मशीदसुद्धा जुनी आहे. मागील ३०० ते ४०० वर्षांमध्ये कुणीही मशिदीचा विषय काढला नाही. (येथील काशी विश्वनाथाचे मंदिर पाडल्यापासून तेथील हिंदूच नव्हे, तर महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांनी याला विरोध केला होता. नंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ज्ञानवापीच्या बाजूला आताचे काशी विश्वनाथ मंदिर बांधले. त्यानंतर इंग्रजांच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरही ज्ञानवापीसाठी हिंदू कायदेशीर लढा देत आहेत, या इतिहासाकडे शरद पवार जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहेत ? – संपादक) अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधील या प्रकरणावरून वातावरण बिघडवण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. हा विषय समोर आणण्यामध्ये भाजप आणि त्यांच्या पक्षाशी संबंधित संघटना उत्तरदायी असून हे खेदजनक आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमध्ये पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या कार्यक्रमात केला.

शरद पवार यांनी मांडलेली सूत्रे

१. या देशात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला अभिमान वाटतो. ताजमहालसारखी वास्तू आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानमधील कुणीतरी समोर येऊन म्हणतो, ‘ताजमहल आमचे (हिंदूंचे) आहे. आमच्या पूर्वजांनी ते बांधले आहे’; मात्र जगाला सर्व ठाऊक आहे. देहलीतील कुतूबमिनार कुणी बांधले, यावर न्यायालय निर्णय देणार आहे; मात्र काही लोक कुतूबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. (ताजमहाल आणि कुतूबमिनारच नव्हे, तर अशा असंख्य वास्तू हिंदूंच्या पूर्वजांनी बांधल्या आहेत, याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. तरीही अशी विधाने होतात, हे संतापजनक ! – संपादक)

२. मी या गोष्टी यासाठी मांडत आहे; कारण देशासमोरील आजच्या खर्‍या समस्या महागाई आणि बेरोजगारी या आहेत; मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हावे या हेतूने धार्मिक विषयांना हवा दिली जात आहे. (देशातील महागाई आणि बेरोजगारी रोखण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाने काय केले अन् आताही महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असतांना काय करत आहेत ? हेही त्यांनी जनतेला सांगायला हवे ! तसेच गुलामगिरीची चिन्हे पालटण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काय केले ?, हेही सांगायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली, याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. भविष्यात न्यायालयातही हे सिद्ध होईल; तरीही सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असणारे हे सत्य पवार का नाकारत आहेत, हे हिंदू जाणून आहेत !