इस्रायली अधिकाऱ्याला मारणाऱ्याला इराणच्या कर्नलला ‘मोसाद’ने १० वर्षांनी केले ठार !

‘रिव्होल्यूशनरी गार्ड कोर’चे कर्नल हसन सय्यद खोदयारी

तेहरान (इराण) – वर्ष २०१२ मध्ये देहलीत झालेल्या कारमधील स्फोटामध्ये इस्रायलच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला ठार मारणाऱ्याला इराणच्या ‘रिव्होल्यूशनरी गार्ड कोर’चे कर्नल हसन सय्यद खोदयारी यांना इस्रायलने ठार केले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये घुसून इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने हसन यांना ठार केल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रिव्होल्यूशनरी गार्ड कोर’ या संघटनेला ‘आतंकवादी संघटना’घोषित केले होते.

इस्रायली सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्नल खोदयारी हेच इस्रायलमधील अनेक राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या हत्येचा कट रचण्यामागील मुख्य सूत्रधार होते. देहलीसह थायलँड, तुर्कस्थान, केनिया, कोलंबिया आणि सायप्रस या देशांमध्ये इस्रायली अधिकाऱ्यांच्या हत्या अथवा त्यांचे अपहरण केल्याचे आरोप त्यांच्यावर होते. मोसादने हे कृत्य केल्याचे अद्याप अधिकृतरित्या घोषित झालेले नसले, तरी इराणच्या राष्ट्रपतींनी या हत्येचा सूड उगवला जाईल, असे म्हटले आहे.