चारधाम यात्रा मार्गावरील कचर्‍यामुळे पर्यावरणाला धोका ! – तज्ञांची चिंता

डेहराडून (उत्तराखंड) – चारधाम यात्रा ३ मेपासून चालू झाल्यानंतर आतापर्यंत ८ लाख लोकांनी ही यात्रा पूर्ण केली आहे. कोरोनामुळे २ वर्षे ही यात्रा बंद होती. यानंतर प्रारंभ झालेल्या या यात्रेच्या मार्गात सध्या सर्वत्र प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या यांसह कचर्‍याचे ढीग दिसत आहेत, जे पर्यावरणासाठी अतिशय धोकादायक आहेत. यावर पर्यावरण तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

१. ‘गढवाल सेंट्रल युनिव्हर्सिटी’च्या भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. एम्.एस्. नेगी म्हणाले की, केदारनाथसारख्या संवेदनशील ठिकाणी ज्या प्रकारे कचरा साचला आहे, तो धोकादायक आहे. यामुळे धूप निर्माण होऊन भूस्खलन होऊ शकते. वर्ष २०१३ ची शोकांतिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. (वर्ष २०१३ मध्ये केदारनाथ येथे महापूर आला होता.)

२. उत्तराखंडमधील ‘हाय अल्टिट्यूड प्लांट फिजिओलॉजी रिसर्च सेंटर’चे संचालक प्रा. एम्.सी. नौटियाल म्हणाले की, पर्यटकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे, त्यामुळे प्लास्टिकचा कचरा वाढला आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक वनस्पतींवरही झाला आहे.