कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष ट्रेड्रोस गेब्रेयसस

दावोस (स्वित्झर्लंड) – सध्या अनेक देशांनी करोना निर्बंध उठवले आहेत. अनेक देशांतील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे चित्र दिसत आहे. तथापि कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नसून सर्व देशांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी केले. येथे आयोजित केलेल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते.

गेब्रेयसस पुढे म्हणाले, ‘‘जगातील ७० देशांमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सध्या सर्वत्रच चाचण्यांची संख्या अल्प झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच सर्वांत अल्प लसीकरण झालेल्या आफ्रिका खंडात कोरोना मृतांची संख्या वाढत आहे. जागतिक लोकसंख्येपैकी केवळ ६० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. खरे तर ‘हा विषाणू यापुढे कसा आणि किती वेगाने पसरेल’, हे अजूनही आपण सांगू शकत नाही.’’