श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतलेल्या विशेष भक्तीसत्संगाचे महत्त्व आणि सत्संगाच्या वेळी त्यांच्या घशावर वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे त्यांच्यासाठी सतत नामजपादी उपाय करावे लागणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. भक्तीसत्संगाचे साधकांसाठी असलेले महत्त्व

‘सनातनच्या साधकांसाठी  २ घंट्यांचा साप्तहिक ‘भक्तीसत्संग’ असतो. भारतभरातील साधक संगणकीय प्रणालीद्वारे त्याचा लाभ घेतात. साधकांमध्ये भक्तीभाव वाढावा, त्यांची प्रत्येक कृती ईश्वर किंवा गुरु यांना स्मरून भावपूर्ण व्हावी आणि त्यामुळे त्यांना ईश्वराच्या समीप जाता यावे यांसाठी हा भक्तीसत्संग असतो. या भक्तीसत्संगात केवळ ‘भावजागृती’ या साधनेच्या एका अंगावरच मार्गदर्शन मिळते असे नव्हे, तर साधनेतील जी अन्य ७ अंगे आहेत, उदा. स्वभावदोष निर्मूलन-गुणसंवर्धन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या अंगांवरही मार्गदर्शन असते. प्रत्येक भक्तीसत्संगात यांसंदर्भातील एखादा विषय असतो. या भक्तीसत्संगात केवळ तात्त्विक विषय असतो, असे नव्हे, तर प्रायोगिक भाग कळण्यासाठी विषयानुरूप देवता, संत किंवा शिष्य याची एखादी गोष्ट असते. त्यामुळे साधकांना ‘साधनेचे ते अंग आत्मसात कसे करायचे ?’, हे कळते. तसेच काही साधक ‘भक्तीसत्संगात केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढच्या गुरुवारपर्यंतच्या आठवडाभरात साधनेचे प्रयत्न कसे केले ?’, हेही अर्ध्या ते पाऊण घंट्यामध्ये सांगतात. त्यावरून अन्य साधकांनाही ‘कसे प्रयत्न करायचे ?’, हे प्रत्यक्ष कळते. त्यामुळे हा भक्तीसत्संग साधकांना साधनेसाठी अमूल्य असा मार्गदर्शक असतो आणि साधक या सत्संगाची आतुरतेने वाट पहात असतात. गेली २ वर्षे जगभर कोरोना महामारी चालू आहे. येत्या काही वर्षांच्या काळात नैसर्गिक आपत्ती येतील, तिसरे महायुद्ध होईल असे द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांचे भाकीत आहे. या कठीण काळात देवावर श्रद्धा, भक्तीभाव असल्यासच देव तारील. त्यामुळे साधना वाढण्यासाठी आणि आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्तीसत्संगाचे महत्त्व लक्षात येते. या सत्संगामुळे साधकांमध्ये भक्तीचे बीज रुजले असून आता त्याचा वृक्ष बहरत आहे.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या भक्तीसत्संग घेत असणे

या भक्तीसत्संगाचे आणखी एक महत्त्व म्हणजे, हा भक्तीसत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या घेतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘त्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत’, असे सप्तर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीद्वारे’ २ वर्षांपूर्वी सांगितले आहे. त्या वेळी त्या २२ वर्षे साधना करून ‘सद्गुरुपदी’ विराजमान होत्या. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सर्वत्रच्या साधकांना साधनेमध्ये मार्गदर्शन करतात. एवढा त्यांचा आध्यात्मिक अधिकार आहे ! त्यामुळे त्यांच्या वाणीत चैतन्य आहे. तसेच त्या भक्तीसत्संगाच्या विषयाशी पूर्णतः एकरूप होऊन, तसेच भावपूर्णपणे सत्संगामध्ये बोलत असतात. त्यामुळे भक्तीसत्संगाच्या वेळी वातावरणात पालट होऊन ते आल्हाददायक झाल्याचे, वातावरणात गारवा पसरल्याचे, सत्संगाच्या विषयानुसार त्या त्या देवतेच्या तत्त्वाने वातावरण भारित झाल्याचे साधकांना जाणवते. साधकांची अंतर्मुखता साधली जाते. त्यामुळे त्यांच्या अंतर्मनापर्यंत तो विषय पोचून त्यांच्याकडून पुढील आठवड्यात त्याप्रमाणे प्रयत्न होतात. भक्तीसत्संगामुळे साधकांना समाजात जाऊन अध्यात्माचा प्रसार करणे, समाजाशी जवळीक करणे आणि देवाची कृपा संपादन करणेही सुलभ जाते. तसेच एखाद्या कठीण प्रसंगावर मात करणेही सोपे जाते; कारण साधकांची देव आणि गुरु यांच्यावरील श्रद्धा वाढते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भक्तीसत्संग घेण्याचे हे महत्त्व आहे.

३. ‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे माहात्म्य’ हा विशेष भक्तीसत्संगाचा विषय !

‘सप्तर्षींनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘श्रीविष्णूचा जयंतावतार’ असल्याचे सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘जगभर अध्यात्माचा प्रसार करा’, असे सांगितले. त्यांच्या आदेशाप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ते गुरुकार्य ३० वर्षांपूर्वी आरंभले. एवढेच नव्हे, तर त्यांनी जगभर ईश्वरी राज्य आणण्याचे, म्हणजेच धर्मसंस्थापना करण्याचे महान उद्दीष्टही ठेवले. यासाठी ते गेली ३० वर्षे अथक परिश्रम करत आहेत. त्यांनी प्रथम भारतभरातील, तसेच पुढे जगभरातील जिज्ञासूंना हेरून त्यांना साधना सांगितली आणि सहस्रो साधक निर्माण केले. अजूनही त्यांचे हे कार्य चालूच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक गुणांनी युक्त असल्याने साधकांसाठी ते सर्वच बाबतींत ‘एक आदर्श’ आहेत आणि साधकही त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीतीमुळे साधक त्यांच्याशी घट्ट जोडले गेले आहेत. साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना इतकी वर्षे अनुभवले आहे. त्यांच्यातील गुण आणि कार्य यांमुळे सर्वच आचंबित होतात. ‘ते एवढे मोठे धर्मसंस्थापनेचे कार्य कसे करू शकतात ?’, याचे सर्वांना असलेले कोडे सप्तर्षींनी उलगडले आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘श्रीविष्णूचा अवतार’ असल्याचे सांगितले. या भक्तीसत्संगाचा हाच विषय होता.

‘श्रीविष्णूला जयंतावतार घेण्याचे कारण काय होते ?’, हे यामध्ये स्पष्ट केले होते. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, तसेच साधकांच्या उद्धारासाठी झालेला हा अवतार आहे’, असे साक्षात सप्तर्षींचे उद्गार आहेत. तसेच अनेक संतांनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाविषयी सांगितले आहे. साधकांना या भवसागरातून साधनेद्वारे उद्धरून नेण्यासाठी, भरकटलेल्या समाजाला भगवद्भक्तीकडे वळवण्यासाठी आणि जगभर धर्मसंस्थापना करण्यासाठी श्रीमन्नारायणस्वरूप या गुरुदेवांचा जन्म झाला आहे. ‘गुरूंप्रती कसा भाव ठेवायचा ?’, ‘गुरुकार्य करून त्यांच्या चरणी कसे समर्पित व्हायचे ?’ आणि ‘आपल्या या मनुष्यजन्माचे कसे सार्थक करून घ्यायचे ?’, हे या भक्तीसत्संगात सांगितले होते. राम-कृष्णाच्या वेळी ‘ते अवतार आहेत’, याची जाणीव सामान्य जनांना नव्हती; पण आज महर्षींच्या कृपेने ‘परात्पर गुरुदेव म्हणजे साक्षात श्रीविष्णुच आहेत’, याची अनुभूती साधक घेऊ शकतात, तसेच अवतारी गुरूंचे कार्य साधक पाहू शकतात, हे या भक्तीसत्संगात सांगितले होते. या भक्तीसत्संगामुळे साधकांच्या अंतरंगात ‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महिमा’ कोरला गेला. त्यामुळे ते पृथ्वीच्या आध्यात्मिक सिंहासनावर विराजमान आहेत’, असेही महर्षि सांगतात.

वैशाख कृष्ण सप्तमी, म्हणजे या वर्षी २२ मे २०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना (श्रीविष्णूच्या अवताराला) ८० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सप्तर्षींच्या आज्ञेने त्यांचा जन्मोत्सव त्या कालावधीत होणार आहे. या जन्मोत्सवाच्या पूर्वी १० दिवस आधी त्यांचे माहात्म्य जाणून घेण्याची संधी या भक्तीसत्संगामुळे साधकांना लाभली. केवढे हे त्यांचे भाग्य !

४. प्रत्येक भक्तीसत्संगाच्या अर्धा घंटा आधी नामजपादी उपाय करून वाईट शक्तींनी आणलेले अडथळे दूर करावे लागत असणे !

सध्या कलियुगात बहुतांश समाज निकृष्ट, वाममार्गी आणि अधर्माचरणी झाला असल्याने वाईट शक्तींचे फावले आहे. त्यामुळे त्यांचा पुष्कळ प्रकोप झाला आहे. त्यांना आसुरी राज्यच हवे असते; पण प्रत्येक गुरुवारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेल्या भक्तीसत्संगाचे पुष्कळ महत्त्व असल्याने आणि त्यामुळे साधक अन् साधकांमुळे समाज घडत असल्याने वाईट शक्ती प्रत्येक भक्तीसत्संगात काही ना काही अडथळे आणतात. तसेच त्या सत्संग घेणाऱ्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावरही आक्रमण करून त्यांचा आवाज बसवतात, त्यांना खोकला आणतात किंवा त्यांच्यावर त्रासदायक शक्तींचा दाब निर्माण करतात. त्यामुळे प्रत्येक भक्तीसत्संगाच्या अर्धा घंटा आधी मी गुरुकृपेने नामजपादी उपाय करून वाईट शक्तींनी काही अडथळे आणले असल्यास ते दूर करतो. सत्संग चालू असतांना अचानक काही अडथळा आल्यास तोही नामजप करून दूर करतो.

५. भक्तीसत्संगाचा परिणाम सप्तपाताळापर्यंत होत असल्याने नामजप न केल्यास श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या विशुद्धचक्रावर त्रासदायक शक्ती जमा होत असणे !

१२.५.२०२२ या दिवशी मराठीतून झालेल्या ‘श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे माहात्म्य’ या भक्तीसत्संगाच्या अर्धा घंटा आधी मी नेहमीप्रमाणे नामजपादी उपाय केले, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठीही नामजपादी उपाय केले. त्या दिवशी सत्संगाआधी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना त्यांचा आवाज थोडा बसला असल्याचे जाणवत होते. मी उपाय पूर्ण केल्यावर त्यांनी निरोप पाठवला, ‘आज भक्तीसत्संगात माझ्यासाठी पूर्ण वेळ नामजप करा.’ त्यामुळे मला आजच्या भक्तीसत्संगाचे महत्त्व लक्षात आले. तसेच वाईट शक्तींचा जोर आज पुष्कळ असणार, हेही लक्षात आले. भक्तीसत्संग चालू झाल्यावर मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या केवळ विशुद्धचक्रावर त्रास जाणवत होता. याचा अर्थ वाईट शक्ती त्यांच्या गळ्यावर आक्रमण करून ‘त्यांना बोलता येणार नाही’, असे नियोजन करत होत्या. मला लक्षात येत होते, ‘वाईट शक्ती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर वरून, तसेच पाताळातून आक्रमण करत आहेत.’ यावरून या विशेष भक्तीसत्संगाचा परिणाम किती मोठा आहे, हे कळले. भक्तीसत्संगाचा परिणाम सप्तपाताळापर्यंत होत होता. मला सातत्यानेच नामजप करावा लागत होता. एक मिनिटही उपाय न केल्यास श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या विशुद्धचक्रावर लगेच त्रासदायक शक्ती जमा होत होती. त्यामुळे मला सतर्क रहावे लागत होते. तरीही एकदा मला निरोप आलाच, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज मधे मधे अडखळत आहे.’ त्यामुळे मी भक्तीसत्संगासाठी आणखी सतर्कतेने शेवटपर्यंत नामजप केला. भक्तीसत्संगाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमण होत असल्याचा अनुभव मला रात्री झालेल्या हिंदी भाषेतील भक्तीसत्संगाच्या वेळीही आला; पण त्या वेळी ७५ टक्के सत्संग झाल्यानंतर वाईट शक्तींचे सूक्ष्मातून आक्रमण होणे बंद झाले.

भक्तीसत्संग घेतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर सतत एवढी आक्रमणे होण्याचे कारण म्हणजे हा सत्संग संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून एकाच वेळी सहस्रो साधकांपर्यंत पोचत होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत होते; पण हे सर्व उपक्रम देशभरात वेगवेगळ्या दिवशी आयोजित केले जात होते. याउलट भक्तीसत्संगामुळे एकाच वेळी देशभरातील सहस्रो साधकांच्या मनात अवतारी गुरूंची महती बिंबली जात होती आणि ते ‘धर्मसंस्थापना करणे’ हे गुरुकार्य करण्यास प्रोत्साहित होत होते. हा परिणाम आध्यात्मिक स्तरावरील होता. त्यामुळे वाईट शक्ती भक्तीसत्संगावर सातत्याने आक्रमण करत होत्या. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाही सत्संगात बोलतांना ‘सतत सूक्ष्मातून आक्रमणे चालूच आहेत; पण सतत चैतन्यदायी उपायही होत आहेत’, असे जाणवत होते.

६. कृतज्ञता

सूक्ष्मातून एवढी आक्रमणे होऊनही श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ प्रत्येक गुरुवारी भक्तीसत्संग भावपूर्ण, चैतन्याच्या स्तरावर आणि परिपूर्ण घेतात, हे केवळ साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ! यावरून त्यांची तळमळ, त्याग आणि साधकांप्रती प्रीती लक्षात येतो. गुरुमाऊलीच असे करू शकते. यासाठी मी त्यांच्या चरणी सर्व साधकांच्या वतीने कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.५.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक