श्रीमहाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आतुर झालेले साधक, निसर्ग आणि अवघी सृष्टी !

सनातनच्या साधकांसाठी प्रत्येक गुरुवारी ‘भक्तीसत्संग’ असतो. साधकांमध्ये भक्तीभाव वाढावा आणि त्यांना ईश्वराच्या समीप जाता यावे, यांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे सर्वत्रचे साधक या भक्तीसत्संगाचा लाभ घेतात. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीतील या सत्संगामुळे साधक ते भावविश्व प्रत्यक्ष अनुभवू शकतात. या सत्संगांमुळे सहस्रो साधकांना साधनेचे प्रयत्न वृद्धींगत करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याने या सत्संगाला वाईट शक्तींचा विरोधही मोठ्या प्रमाणात होतो. वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भक्तीसत्संगात करण्यात आलेले निवडक मार्गदर्शन, वाईट शक्तींमुळे आलेले अडथळे आणि सूक्ष्मपरीक्षण आदी सूत्रे पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले

मार्गदर्शन : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

संकलक : कु. वैष्णवी वेसणेकर (वय २२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

‘आज वैशाख कृष्ण सप्तमी ! श्रीमहाविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आज ८० वा जन्मोत्सव आहे. गेली ८० वर्षे त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमाता स्वतःला धन्य समजत आहे. खरेतर या भूतलावरील रज-तमाने ग्रासलेला प्रत्येक जीव परात्पर गुरु डॉक्टरांच्या दिव्य चैतन्यमय ऊर्जेच्या बळावरच श्वास घेऊ शकत आहे, अन्यथा या घोर कलियुगात जगणेही कठीण झाले असते. अशा विष्णुस्वरूप गुरुदेवांचे दिव्य कार्य सध्या या पृथ्वीतलावर चालू आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाचा आनंद देवता, उच्च लोकांतील जीव, तसेच निसर्ग यांना होत असणे !

जगभरातील सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाची वाट पहात असतात. त्याचप्रमाणे निसर्ग, पशू-पक्षी, झाडे-वेली; एवढेच नव्हे, तर ऋषिमुनी आणि सप्तलोकांतील पुण्यात्मे, अशी सारी सृष्टीच त्यांच्या जन्मोत्सवाची वाट पहात असते. सर्व जण त्यांचे दर्शन घेण्याची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतात.

अ. देवलोकातून देवता आतुर होऊन जणू परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी हातात फुले घेऊन सिद्ध असतात. देवतांसह यक्ष, गंधर्व, किन्नर आणि अप्सरा जन्मोत्सवाची वाट पहात असतात.

आ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील, म्हणजे साक्षात् भूवैकुंठातील चैतन्य आणि आनंद यांत वृद्धी होते.

इ. आश्रमाच्या अवतीभोवती पक्ष्यांची किलबिल वाढून जणूकाही ‘तेही आनंद व्यक्त करत आहेत’, असे वाटते.

ई. रामनाथी आश्रमाच्या बाहेर निसर्गाकडे पाहिले, तर लक्षात येते, ‘वृक्ष, झाडे, फुले आणि वेली डोलत आहेत. प्रत्येक जण आनंद व्यक्त करत आहे.’

श्री गुरूंच्या जन्मोत्सवाचा आनंद केवळ साधकांनाच नाही, तर निसर्ग आणि उच्च लोकांतील देवता अन् जीव यांनाही होत असतो.

२. विष्णुतत्त्व भूतलावर अवतरू लागल्याने जन्मोत्सवाच्या कालावधीत साधकांकडून साधनेचे प्रयत्न उत्साहाने होणे

कु. वैष्णवी वेसणेकर

श्रीकृष्णजन्माष्टमीच्या काही दिवस आधीच कृष्णभक्तीचे तरंग कृष्णभक्तांच्या अंतरात उमटू लागतात. श्रीरामनवमीच्या काही दिवस आधीच वातावरणात रामतत्त्व कार्यरत होऊन श्रीरामतत्त्वाची अनुभूती येऊ लागते. महाशिवरात्रीच्या काही दिवस आधीच आपल्याला शिवाचे स्मरण होते, तसेच त्याचे तत्त्व हळूहळू वातावरणात वाढत असल्याची अनुभूती येते. त्याचप्रमाणे आपल्या परम प्रिय परात्पर गुरुमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या काही दिवस आधीपासूनच गुरुतत्त्व आणि विष्णुतत्त्व भूतलावर अवतरू लागते. श्री गुरूंच्या जन्मोत्सवाच्या वेळची दिव्य विष्णुमय स्पंदने जन्मोत्सवाच्या आधी आणि जन्मोत्सवानंतरही अनुभवणाऱ्या साधकांकडून गुरुसेवा अन् साधना यांचे प्रयत्न अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने होऊ लागतात.

३. साधकांना त्यांच्या घरीही रामनाथी आश्रमातील जन्मोत्सवाचे वातावरण अनुभवता येणे

सनातनचे साधक परात्पर गुरु डॉक्टरांवर अधिकाधिक भक्ती आणि श्रद्धा ठेवून साधनेचे प्रयत्न करत आहेत. साधकांना त्यांच्या घरीही रामनाथी आश्रमातील, म्हणजे या भूवैकुंठातील जन्मोत्सवाचे वातावरण अनुभवता येते.

४. विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर साजरा केला जात असणारा श्री गुरूंचा जन्मोत्सव !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात सर्वत्र ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ‘हिंदु राष्ट्रासाठी मंदिरांमध्ये देवतांना साकडे घालणे, समस्त हिंदूंच्या संघटनासाठी ‘हिंदु एकता दिंडी’ काढणे’, अशा दैवी उपक्रमांच्या माध्यमातून जणू श्री गुरूंचा जन्मोत्सवच व्यापक स्तरावर साजरा केला जात आहे.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१४.५.२०२२)

साधकांनो, श्रीगुरूंच्या जन्मोत्सवाचा आनंद अंतरात अनुभवता येण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करा !

‘श्रीगुरूंचा जन्मोत्सव, म्हणजे सर्वत्रच्या साधकांसाठी आनंदोत्सव आहे. श्रीगुरूंच्या जन्मोत्सवाचा आनंद आपल्याला स्थुलातील सेवांसह आपल्या अंतरातही अधिकाधिक अनुभवायचा आहे. सर्व साधकांनी भाववृद्धी, साधकत्ववृद्धी, तसेच व्यष्टी आणि समष्टी साधना यांसाठी झोकून देऊन प्रयत्न करायला हवेत. साधकांनी झोकून देऊन साधनेचे प्रयत्न केल्यास त्यांना अधिकाधिक ईश्वरी तत्त्व अनुभवता येऊन भगवंत करत असलेल्या कृपेच्या वर्षावाची अनुभूती घेता येते. तेव्हा साधकांनो, आतापासूनच साधनेचे प्रयत्न अहोरात्र, अखंड, अगदी मनापासून आणि तळमळीने करा !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१४.५.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक