परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या पूर्वी त्यांच्या डाव्या हाताच्या दंडावर अनेक दैवी कण येणे, हे त्यांच्या देहातील श्रीविष्णुतत्त्व जागृतीला आरंभ झाल्याचे द्योतक !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या दंडावर दिसून आलेले दैवी कण (गोलात मोठे करुन दाखवले आहेत.)

१. १८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डाव्या हाताच्या दंडावर अनेक दैवी कण दिसून येणे !

‘वैशाख कृष्ण सप्तमी (२२ मे २०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव आहे. श्रीरामनवमी जवळ आली की, वातावरणातील श्रीरामतत्त्व वृद्धींगत होते. श्रीकृष्णजयंतीच्या कालावधीत श्रीकृष्णतत्त्व वाढते. त्याचप्रमाणे महर्षींनी ‘श्रीमन्नारायणाचा अवतार’ म्हणून गौरवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीतही वातावरणातील श्रीविष्णुतत्त्व वृद्धींगत होत आहे. याची सनातनचे सर्वत्रचे साधक अनुभूती घेत आहेत. या श्रीविष्णुतत्त्वाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहावरही प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो, हे दर्शवणारी अलौकिक घटना १८.५.२०२२ या दिवशी घडली. त्या दिवशी सायंकाळी परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या डाव्या हाताच्या दंडावर अनेक दैवी कण दिसून आले. विशेष म्हणजे हे दैवी कण त्वचेमध्ये आहेत. याचा अर्थ हे दैवी कण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शरिरामध्येच निर्माण झाले आहेत.

२. या दैवी कणांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील अवतारी तत्त्वाचे स्थूल प्रकटीकरण झाल्याची दिव्य अनुभूती सर्वत्रचे साधक घेऊ शकणार असणे !

२२ मे या दिवशी असलेला परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव म्हणजे त्यांचा अवतार प्रकट होण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या दंडावर दैवी कणांचे झालेले आगमन ही त्यांच्या देहातील श्रीविष्णुतत्त्व जागृत होण्याला आरंभ झाल्याची प्रचीती आहे. एरव्ही सूक्ष्मातून त्यांच्या देहातून त्यांच्या अवतारी तत्त्वाचे प्रक्षेपण अखंड चालू असते. या दैवी कणांच्या माध्यमातून त्याचे स्थूल प्रकटीकरण झाल्याने त्या अवतारी तत्त्वाची अनुभूती सर्वत्रचे साधक ‘याची देही याची डोळा’ घेणार आहेत.

३. वर्ष २०१२ मध्येच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोनेरी दैवी कणांच्या माध्यमातून त्यांच्यातील अवतारी तत्त्व दर्शवून दिलेले असणे आणि वर्ष २०१५ पासून महर्षींनी नाडीपट्ट्यांद्वारे त्यावर शिक्कामोर्तब केले असणे !

दैवी कणांची माहिती साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः वर्ष २०१२ मध्ये प्रथम करून दिली. तेव्हा त्यांनी त्यांच्या देहावर असलेल्या सोनेरी दैवी कणांचे दर्शन साधकांना घडवले होते. हे दैवी कण म्हणजे कोणताही धातू नसल्याचे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले होते, तसेच ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचे घनीकरण असल्याचे आध्यात्मिक संशोधनातून (ज्ञान आणि सूक्ष्म परीक्षण यांतून) सिद्ध झाले होते. याचा अर्थ वर्ष २०१२ मध्येच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्यातील अवतारी विष्णुतत्त्व दर्शवून दिले होते. वर्ष २०१५ पासून महर्षींनी नाडीपट्ट्यांद्वारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा जयंतावतार आहेत’, असे सांगितल्याने यावर शिक्कामोर्तब झाले !

‘हे गुरुदेव, आपल्या रूपाने आम्हाला आपल्या अवतारी तत्त्वजागृतीची ही अलौकिक घटना पहाण्याचे भाग्य लाभत आहे. आपले हे अवतारी तत्त्व आम्हाला अधिकाधिक ग्रहण करता यावे’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे !’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.५.२०२२)

कठीण शारीरिक स्थितीतही साधकांसाठी दैवी कणांची छायाचित्रे काढण्यास सांगणारे परात्पर गुरुदेव !

‘साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जेव्हा त्यांच्या डाव्या दंडावर दैवी कण असल्याचे दाखवले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आनंद झाला. तेव्हा त्यांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प होती. अशी कठीण शारीरिक स्थिती असतांनाही त्यांनी या दैवी कणांची छायाचित्रे काढून घेतली, तसेच पुढील पिढीला ही दिव्य घटना पहाता यावी, यासाठी त्या दैवी कणांचे चित्रीकरणही करून घेतले. ‘सर्वत्रच्या साधकांना दैवी कण पहाण्यास मिळून त्यांना आनंद मिळावा’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी दैवी कणांचे छायाचित्र आणि ते निर्माण होण्यामागील शास्त्र दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्याविषयी सुचवले. ‘साधकांना याचा आनंद कसा द्यायचा’, या दृष्टीने त्यांचा विचार चालू होता.’

– श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२२)

‘हिंदु राष्ट्र-जागृती’ उपक्रमांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निर्गुण अवतारी तत्त्वाची प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गेल्या १ मासापासून देशभरात विविध ठिकाणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यांना समाजाचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. याअंतर्गत विविध शहरांत काढलेल्या ‘हिंदू एकता दिंडीला’ लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद, ही श्रीगुरूंच्या कार्याच्या व्यापकत्वाची प्रत्यक्ष प्रचीती आहे. प्रत्येक ठिकाणी दिंडीतील वातावरण अत्यंत चैतन्यमय आणि भावमय तर होतेच; परंतु त्याची जाणीव समाजालाही होत होती, हे यंदाचे विशेष आहे ! या दिंड्यांच्या वेळी समाजातील अनेक जण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा कोणताही परिचय नसतांना या दिंड्यांतील त्यांचे छायाचित्र असलेल्या पालखीला भावपूर्ण नमस्कार करत होते. सूर्य उगवला की, फुलांना ‘उमला’, असे सांगावे लागत नाही. सूर्याच्या अस्तित्वानेच ती आपोआप उमलतात. त्याचप्रमाणे अवतारी तत्त्वाचे प्रकटीकरण होऊ लागले की, सात्त्विक जिवांना त्याची जाणीव आपोआपच होते आणि ते अवताराकडे आकर्षित होतात. याच्या अनेक अनुभूती सनातनच्या साधकांनी ठिकठिकाणी काढलेल्या दिंड्यांच्या कालावधीत आल्या. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्गुण तत्त्व ज्या प्रकारे वृद्धींगत होत आहे, त्याच प्रकारे त्यांच्या सगुण देहावरही दैवी कणांच्या माध्यमातून श्रीविष्णुतत्त्वाच्या जागृतीची दिव्य लक्षणे दिसून येत आहेत.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.