नवज्योत सिद्धू यांनी केले आत्मसमर्पण !

सिद्धू यांना पटियाळा कारागृहात जावे लागणार

चंडीगड – पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंह सिद्धू यांनी पंजाबच्या पतियाळा न्यायालयात आत्मसमर्पण केले. वर्ष १९८८ मध्ये झालेल्या एका वाहन अपघाताच्या वेळी सिद्धू यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना १ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या पार्श्‍वभूमीवर सिद्धू यांना पटियाळा कारागृहात जावे लागणार आहे.

याआधी सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ (शिक्षा भोगायच्या आधी शेवटची संधी देण्याची मागणी करणारी याचिका) प्रविष्ट केली होती. यामध्ये स्वास्थ्य बिघडल्याचे कारण देत सिद्धू यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली होती; परंतु त्यांचे अधिवक्ता सरन्यायाधिशांकडे ही मागणी करण्यात अयशस्वी ठरल्याने सिद्धू यांनी आत्मसमर्पण केले.