(म्हणे) ‘अण्णासाहेब मोरे यांच्या आर्थिक शोषणाची चौकशी करावी !’

  • नाशिक येथील ‘अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठा’तील अपहारप्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची लुडबूड !

  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

नाशिक – जिल्ह्यातील दिंडोरी येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख श्रीराम खंडेराव उपाख्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्यावर ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी हे आरोप केले आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘श्री. अण्णासाहेब मोरे यांनी अध्यात्माच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण केले असून त्याची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठात अध्यात्माच्या नावाखाली जादूटोणा, करणी, चमत्कार आणि भोंदूगिरी यांचे प्रकार भक्तांच्या मनावर बिंबवले जात आहेत. धार्मिक श्रद्धा आणि अज्ञान यांच्या नावाखाली भाविकांचे आर्थिक शोषण होत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या केंद्रावर कठोर कारवाई करावी.

संपादकीय भुमीका

  • वर्ष २०१७ मध्ये भारताच्या गृह मंत्रालयाने विदेशी योगदान (नियमन) कायदा, २०१० अंतर्गत परकीय निधीचा खुलासा न करण्याविषयी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या संघटनेमधील आर्थिक अपव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर कागदपत्रे पडताळतांना त्रुटी आढळल्या आहेत. हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनीही यापूर्वी अंनिसचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे गुरुपीठाच्या कार्यात नाक खुपसण्यापेक्षा अंनिसने स्वतःच्या अपहाराकडे लक्ष द्यावे !
  • आर्थिक शोषणाविषयी एकाही भक्ताने तक्रार केलेली नाही, मग अंनिस कुठल्या आधारावर असे आरोप करत आहे ?