पुणे – शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे पाणीपट्टीपोटी १०५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती अधिकाराच्या माहितीतून समजली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात येत आहे. ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून माहिती अधिकारातून समोर आणली आहे.
या थकबाकीमध्ये पुणे कॅन्टोंमेट बोर्डाकडे (पुणे कटक मंडळ) ४७ कोटी ५ लाख रुपये, रेल्वे विभागाकडे ५ कोटी, तसेच टपाल कार्यालय, आकाशवाणी, बी.एस्.एन्.एल्., सार्वजनिक बांधकाम, पोलीस विभाग, महावितरण आणि एम्.जे.पी. यांसारख्या राज्यशासनाच्या आस्थापनांकडेही लाखो रुपयांची थकबाकी आहे, अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली आहे.
संपादकीय भुमीकासामान्य नागरिकांना पाणीपट्टी थकबाकीसाठी पाठपुरावा घेणारी महापालिका शासकीय कार्यालयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष का करते ? एवढी थकबाकी कुणामुळे राहिली हे शोधून त्यांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे. ही थकबाकी व्याजासहित वसूल व्हावी, असेच जनतेला वाटते. |