खुलताबाद (जिल्हा संभाजीनगर) येथील तरुणांना पोलीस आणि मुसलमान समाजातील व्यक्तींनी दिली समज !

औरंगजेबाच्या थडग्याच्या दर्शनावर बंदी घालण्याचे प्रकरण

समज देताना पोलीस

संभाजीनगर – ‘एम्.आय.एम्.’चे तेलंगाणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी जिल्ह्यातील खुलताबाद येथे हिंदुद्रोही आणि हिंदुद्वेषी औरंगजेबाच्या थडग्याचे दर्शन घेतल्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि एका संघटनेचे पदाधिकारी यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात ठेवली जाणार नाही, अशी चेतावणी दिली होती. या पार्श्वभूमीवर १७ मे या दिवशी खुलताबाद येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलीस आणि मुसलमान समाजातील काही व्यक्तींनी तरुणांना समज देत वातावरण शांत केले. पोलिसांनी थडग्याच्या परिसरात बॅरिकेड्स लावून सुरक्षा वाढवली आहे. पुरातत्व विभागाचे संवर्धन साहाय्यक राजेश वाकलेकर हेही औरंगजेबाच्या कबरीजवळ तात्काळ आले होते. परिस्थितीची पूर्ण माहिती घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी थडग्याच्या परिसरात २ सुरक्षारक्षक तैनात केले आहेत.