भारतात वर्ष २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळे १६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू ! – ‘लॅन्सेट’ नियतकालिक

नवी देहली – भारतात प्रदूषणामुळे प्रतिदिन ६ सहस्र ५०० लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती प्रदूषण आणि आरोग्य याविषयीच्या अमेरिकेतील ‘लॅन्सेट’ नावाच्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकाने  एका अहवालात प्रसिद्ध केली आहे. देशात कोरोनाच्या काळात ४ सहस्र लोकांचा प्रतिदिन मृत्यू  होत होता. त्या तुलनेत हा आकडा अधिक आहे.

१. या अहवालानुसार प्रदूषणामुळे वर्ष २०१९ मध्ये जगात ९० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ष २००० मध्ये या आकड्यांमध्ये ५५ टक्के वाढ झाली आहे. सर्वाधिक २४ लाख मृत्यू चीनमध्ये झाले आहेत. या सूचीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात १६ लाख ७० सहस्र लोकांचा जीव वायू प्रदूषणामुळे गेला आहे. अमेरिका ७ व्या क्रमांकावर आहे.

२. वायू प्रदूषणामुळे जगभरात ६६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू झाला आहे. तज्ञांच्या मते, यासाठी जलवायू प्रदूषण उत्तरदायी आहे. १७ लाख लोकांचा जीव धोकादायक रसायनांमुळे गेला आहे.

३. युद्ध, आतंकवाद, मलेरिया, एच्आयव्ही, क्षयरोग, अमली पदार्थ आणि दारू यांच्या तुलनेत प्रदूषणाचा आरोग्यावर अधिक परिणाम होत असतो, असे या अहवालात म्हटले आहे.

४. काही दिवसांपूर्वी लॅन्सेटनेच कोरोनामुळे भारतात मृत्यू पावलेल्यांची संख्या ४० लाखांहून अधिक असल्याचे म्हटले होते. याचे भारत सरकारने जोरदार खंडण केले होते.

संपादकीय भूमिका

लॅन्सेट नियतकालिकाचे याआधीचे अहवालही वादग्रस्त होते. ‘भारताशी संबंधित ही आकडेवारीही फुगवून तर सांगितली नाही ना ?’, याची सरकारने चौकशी करून याचे खंडण करणे आवश्यक !