केरळमध्ये दोघा भावांच्या हत्येप्रकरणी २५ जणांना जन्मठेप

मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झाला होता वाद

‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या २५ कार्यकर्त्यांना जन्मठेप

पलक्कड (केरळ) – केरळच्या पलक्कड जिल्ह्यात झालेल्या दोन भावांच्या हत्येच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’च्या (‘आय.यू.एम्.एल्.’च्या) २५ कार्यकर्त्यांना १६ मे या दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका मशिदीसाठी देणगी गोळा करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांची हत्या करण्यात आली होती.

विशेष सरकारी अधिवक्ता कृष्णन् नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार डाव्या आघाडीचा समर्थक असलेला ‘एपी सुन्नी’ या पक्षाचे सदस्य नुरुद्दीन आणि हमझा या दोघा भावांच्या हत्येसाठी अतिरिक्त जिल्हा अन् सत्र न्यायाधीश रजिता टी.एच्. यांनी १२ मे या दिवशी २५ आरोपींना दोषी ठरवले होते. न्यायालयाने आरोपींना दंडाचीही शिक्षा ठोठावली असून दंडाची एकूण रक्कम मृतांच्या कुटुंबियांना दिली जाणार आहे.

मृतांचा भाऊ कुंजु महंमद याच्यावरही आक्रमण करण्यात आले होते; परंतु तो त्यातून बचावला. तोच या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होता. या प्रकरणी पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवून प्रत्येकी ३ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षाही सुनावल्याचे कृष्णन् यांनी सांगितले.