मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष देवधर यांची स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार
पुणे, १६ मे (वार्ता.) – सारसबाग येथील परिसरात काही धर्मांध नमाजपठण करत असल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. या चलचित्रावरून मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष देवधर आणि अन्य पदाधिकारी यांनी मिळून १२ मे या दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सारसबाग येथील तळ्याचा गणपति मंदिर पेशवेकालीन हिंदु मंदिर आहे. याच सारसबागेत काही मुसलमान युवक नमाजपठण करत असल्याचे चलचित्र प्रसारित झाले आहे.
(सौजन्य: पुणे दर्पण न्यूज )
सारसबाग येथून २०० मीटर अंतरावर आदमबाग मशीद आहे. त्यासह पर्वती पायथा, स्वारगेट या भागांतही मशिदी आहेत. संबंधितांनी तेथे जाऊन मोकळेपणाने, पाहिजे तितक्या वेळ प्रार्थना करावी. या प्रकरणी हिंदूंच्या भावना दुखावल्या असून, तसेच सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रार्थना करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वाटते. प्रशासनाने ‘सारसबागेत प्रार्थना करू नये’, अशी सार्वजनिक सूचना तातडीने करावी. गणेश मंदिर परिसरात जाणीवपूर्वक नमाजपठण करणे, याविषयी प्रशासनाने ‘लांगूलचालन’ न करता या चलचित्राची कायदेशीर पडताळणी करून योग्य ती कारवाई करावी. ‘याविषयी पुढील कारवाईसाठी पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घेत आहे’ ,असे आशिष देवधर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
संपादकीय भूमिकाअशा तक्रारी का कराव्या लागतात ? प्रशासनाने याकडे स्वतःहून लक्ष द्यावे, ही अपेक्षा ! |