परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदू एकता दिंडी’ !
चिपळूण, १६ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे १५ मे २०२२ या दिवशी दुपारी ३.३० वाजता ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. यामध्ये विविध संप्रदाय, संघटना, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, साधक आदी मिळून १ सहस्र ४०० जण सहभागी झाले होते. या दिंडीला सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, पू. चंद्रसेन मयेकर, पू. श्रीकृष्ण आगवेकर आणि पू. स्नेहलता शेट्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
असा झाला दिंडीला प्रारंभ . . .
दिंडीच्या प्रारंभी सनातनचे साधक श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. त्यानंतर ओझरवाडी जय हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष, तसेच माजी सैनिक श्री. अशोक घेवडेकर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. ‘इस्कॉन’चे श्री. सूर्यकांत आंब्रे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार घातला. स्वयंसिद्ध दत्ताधिष्ठान पातेपिलवलीचे पू. संतोष महाराज वनगे यांनी धर्मध्वजाला श्रीफळ अर्पण केले. यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी पालखीतील भगवान परशुराम आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्रांचे पूजन केले. सनातनचे साधक श्री. महेंद्र चाळके आणि सौ. मिनल चाळके यांनी वीणापूजन केले. नंतर दिंडीला प्रारंभ होऊन दिंडी बाजारपेठमार्गे श्री वेस मारुति मंदिर येथे आल्यानंतर दिंडीचे रूपांतर सभेत झाले.
धर्मध्वजाचे पूजन आणि पुष्पहार
१. नगरपरिषदेसमोर माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला.
२. गांधी चौक येथे उद्योजक अमोल जोगळेकर आणि अमित जोशी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. तेथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. निखिल किल्लेकर यांनी पुष्पहार अर्पण केला.
दिंडीत सहभागी झालेली पथके आणि देखावे
दिंडीत प्रथम धर्मध्वज, त्यामागे भगवान परशुराम आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र असलेली दिव्य चैतन्यदायी पालखी, त्यानंतर रणरागिणी पथक, वारकरी संप्रदाय, सनातन संस्थेचे पथक, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनींचे डोक्यावर कलश घेतलेले पथक, ‘इस्कॉन’चे भक्त मंडळ, प्रथमोपचार पथक, सुराज्य अभियान पथक, आरोग्य साहाय्य समितीचे पथक, सनातन संस्थेचा बालकक्ष असे दिंडीचे स्वरूप होते. दिंडीमध्ये हातात भगवा ध्वज घेऊन विविध घोषणा देत सनातनचे हितचिंतक आणि विविध संप्रदायांचे अनुयायी या दिंडीत सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परेश गुजराथी यांनी केले.
सावर्डे नांदगाव येथील ह.भ.प. दत्ताराम महाराज मुंडेकर, ह.भ.प. अनंत रसाळ हे वारकरी दिंडीसह सहभागी झाले होते.
ओझरवाडी येथील शिवध्वनी ढोल-ताशा पथकाचे श्री. सूरज नवरत आणि सहकारी यांनी दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही लाठीकाठी आणि दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके दाखवली.
हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतांना छत्रपती शिवराय आणि मावळे देखावा असलेला दापोली येथील धर्मप्रेमींचा चित्ररथ, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा, लोटेचा गाय-वासरू आणि श्रीकृष्ण असलेला चित्ररथ, यांसह श्री. पराग ओक हे वासुदेवाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.
दिंडीत सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ
या दिंडीत ग्रामदैवत श्री कालभैरव सांस्कृतिक मंचचे विश्वास चितळे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दत्तात्रय शितप, ह.भ.प. चंद्रकांत उदेग, शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत मोदी, विभागप्रमुख संदेश किंजळकर, भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, माजी नगरसेवक परिमल भोसले, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ. रश्मीताई गोखले, सौ. राणी महाडिक, सौ. स्नेहल ओकटे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. उदय चितळे, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, श्री महाकाली देवस्थान, पेठमापचे अध्यक्ष अल्हाद दांडेकर, जय हनुमान मित्रमंडळ, ओझरवाडीचे सचिव गणेश आग्रे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रशांत परब आणि सुदेश कांबळी, पेढे येथील उद्योजक दीपक वारे, कापसाळ येथील दीपक साळवी, राजस्थानी विष्णु समाज संघटनेचे खरताराम चौधरी, मनसेचे गुरुप्रसाद पाटील, वहाळ येथील रा.स्व. संघाचे विनायक पाध्ये, लांजा येथील ह.भ.प. दादा रणदिवे, भडवळे (ता. दापोली) सरपंच विजय नाचरे, अशोक रेवाळे, खेड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश सातपुते, केळणे येथील दत्ताराम कदम, भेलसई येथील लवु कोठारे आदी हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
साहाय्य
१. अखिल भारतीय कच्छ कडवा पाटीदार समाजाने सरबत व्यवस्था केली.
२. खेर्डी येथील व्यवसायिक श्री. राजू पवार यांनी वाहन उपलब्ध करून दिले.
दिंडीनंतरच्या सभेत वक्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले मार्गदर्शन !
हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात छत्रपती शिवरायांचे मावळे होऊन सहभागी होऊया ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंच्या संघटितपणाच्या आविष्कारासह हिंदूऐक्याचा उद्घोष या पवित्र परशुराम भूमीत दुमदुमत आहे. या संघटितपणाच्या आविष्कारामध्ये सातत्याने वाढ करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. श्रीराम जन्मभूमी मुक्त करण्यात हिंदूंना मिळालेल्या यशानंतर काशी विश्वनाथ आणि मथुरेची श्रीकृष्णजन्मभूमी आक्रमणमुक्त होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. कलम ३७० रहित होणे, एन्.आर्.सी. आणि सीएए सारखे हिंदूच्या बाजूचे कायदे आदी घटनांच्या माध्यमातून या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांची ज्योत प्रज्वलित केली ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वारकरी महामंडळ
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या हाकेला साद देत आपण सर्वजण या ‘हिंदु एकता दिंडी’त सहभागी झालात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विचारांची ज्योत प्रज्वलित केली. भगवंताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपला प्रतिनिधी म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भूतलावर पाठवले आहे. भारतभूमी ही प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप आदी विरांची भूमी आहे. बहुसंख्य हिंदूंच्या वस्तीत अन्यधर्मीय सुखाने जगू शकतात; मात्र या उलटची स्थिती हिंदूंना क्लेशदायक ठरते. हे चित्र पालटण्यासाठी घराघरांतील माता-भगिनींना जिजामाता व्हावे लागेल आणि आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराज करावे लागेल. हिंदु राष्ट्र निर्मितीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रत्येक हिंदूने नियमित साधना करणे आणि धर्मकार्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी कार्यात जे सहभागी होतील त्यांचा उद्धार निश्चित आहे ! – अधिवक्ता (सौ.) अपर्णा कुलकर्णी, सनातन संस्था
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९७ मध्ये पहिला हिंदु राष्ट्राचा विचार मांडला. भविष्यात हिंदु राष्ट्र अवतरित होणार आहे, हे गुरुदेवांनी आधीच सांगितले होते आणि त्यासाठी ‘आवश्यक हिंदूसंघटनाची समष्टी साधना करा’, असा संदेश त्यांनी दिला होता. आज हिंदु राष्ट्राचा उद्घोष संपूर्ण भारतात होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले एकाच वेळी अनेकविध विषयांवरील ग्रंथांचे संकलन करत आहेत, अध्यात्माचे प्रयोग करत आहेत. एकाच वेळी अनेक कार्य करण्याची क्षमता मानवात नसते, ती क्षमता दैवी अवतारांमध्ये असते. जेव्हा अवतार जन्म घेतात, तेव्हा अनेकांचा उद्धार होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य दैवी, अवतारी आहे. या कार्यात जे सहभागी होतील, त्यांचा उद्धार निश्चित आहे.
अभिप्राय
१. ह.भ.प. जयराम म्हालीम, ह.भ.प. हरिश्चंद्र जोगळे, टेरव : धर्मासाठी हिंदूंनी संघटित होऊन कार्य करायला हवे. आम्ही आमच्या भागात धर्मप्रबोधनाचे कार्य पुढे नेण्यासाठी कटीबद्ध आहोत.
२. श्री. प्रकाश शिर्के, मुंढे : हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी संप्रदाय, संघटना यांमध्ये विभागल्या गेलेल्या हिंदूंनी एकत्र यायला हवे.
३. श्री. राहुल कासेकर, गोवळकोट : हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक हिंदूने वेळ द्यायला हवा.